वेदप्रकाश मिश्रा यांना बी.सी. रॉय पुरस्कार
By Admin | Updated: April 1, 2017 03:03 IST2017-04-01T03:03:38+5:302017-04-01T03:03:38+5:30
कराडच्या क्रिष्णा अभिमत वैद्यकीय विद्यापीठाचे कुलगुरू व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर

वेदप्रकाश मिश्रा यांना बी.सी. रॉय पुरस्कार
राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला सन्मान : नागपुरात होणार नागरी सत्कार
नागपूर : कराडच्या क्रिष्णा अभिमत वैद्यकीय विद्यापीठाचे कुलगुरू व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सल्लागार मंडळाचे चेअरमन डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना वैद्यकीय क्षेत्रातील देशाचा सर्वोच्च सन्मान डॉ. बी. सी. रॉय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नुकतेच नवी दिल्ली येथे झालेल्या समारोहात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते डॉ. मिश्रा यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराने नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित झाल्यानिमित्त नागपूरकरांच्यावतीने डॉ. मिश्रा यांचा नागरी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ८ एप्रिल रोजी वसंतराव देशपांडे सभागृहात सकाळी ११ वाजता डॉ. मिश्रा यांच्या अभिनंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजन समितीचे डॉ. गिरीश गांधी यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली. या विशेष कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, ज्येष्ठ पत्रकार एस.एन. विनोद आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम, अॅड. अभिजित वंजारी, दिलीप भागडे, डॉ. शकील सत्तार आदी उपस्थित होते.
डॉ. वेदप्रकाश मिश्रा हे वैद्यकीय क्षेत्रातीलच नाही तर नागपूरच्या वैचारिक संस्कृतीतील मोठे नाव आहे. नागपूर विद्यापीठाचे परिनियम तयार करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असून विद्यापीठाच्या एकूणच जडणघडणीत त्यांचे मौलिक योगदान आहे.
अनेक संस्थांची महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत. अनेक पुरस्काराने सन्मानित डॉ. मिश्रा यांच्या वक्तृत्व कौशल्य व भाषेवरील प्रभुत्वामुळे सरस्वतीपुत्र म्हणून त्यांचा गौरव केला जात असल्याचे गिरीश गांधी यावेळी म्हणाले.(प्रतिनिधी)