कुलगुरूंच्या नव्या टीमची ‘परीक्षा’
By Admin | Updated: October 6, 2015 03:57 IST2015-10-06T03:57:34+5:302015-10-06T03:57:34+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना १९ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. उन्हाळी

कुलगुरूंच्या नव्या टीमची ‘परीक्षा’
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना १९ आॅक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. उन्हाळी परीक्षांदरम्यान परीक्षा विभागाची कामगिरी फारच सुमार राहिली होती अन् विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनात विभाग सपशेल अनुत्तीर्ण झाला होता.
विद्यापीठात कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्या नेतृत्वातील नव्या ‘टीम’समोर या परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याचे मोठे आव्हान असून खऱ्या अर्थाने त्यांचीदेखील परीक्षा होणार आहे.
विद्यापीठाचे रखडणारे मूल्यांकन आणि उशिरा लागणारे निकाल यामुळे नेहमीच टीकेचा भडीमार करण्यात येतो. उन्हाळी परीक्षांचे निकाल तर नको तितके लांबले. यंदाच्या परीक्षांपासून ‘आॅनलाईन’ मूल्यांकन करण्यात येणार आहे. हा पहिलाच प्रयोग असल्याने विद्यापीठाने सावध भूमिका घेतली आहे. सुमारे वर्षभरानंतर विद्यापीठाला डॉ.नीरज खटी हे पूर्णवेळ परीक्षा नियंत्रक लाभले आहेत. शिवाय प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले हेदेखील परीक्षा विभागाकडे लक्ष ठेवून आहेत. १९ पासून सुरू होणाऱ्या या परीक्षेत जवळपास ६५० परीक्षांचा सहभाग असून ८६ हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यात ७० तर दुसऱ्या टप्प्यात ३८ परीक्षा घेण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
वेळापत्रकानुसार होणार परीक्षा
४यंदा सुरू होणाऱ्या सर्व परीक्षा नियमित वेळेत सुरू होत आहेत. यासाठी परीक्षा भवनातील अधिकारी व कर्मचारी अगोदरपासूनच कामाला लागले होते. मागील वर्षी प्रश्नपत्रिका तयार न झाल्यामुळे वेळेवर परीक्षेचे वेळापत्रक बदलवावे लागले होते. यामुळे परीक्षा आणि निकालाच्या तारखाही पुढे गेल्या होत्या. यंदा मात्र संपूर्ण काळजी घेण्यात आली असून हिवाळी परीक्षा वेळापत्रकाप्रमाणेच पार पडतील असा विश्वास प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केला.
यंदापासून ‘आॅनलाईन’ मूल्यांकन होणारच!
४हिवाळी परीक्षांपासून उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ‘आॅनलाईन’ पद्धतीने करण्यात येणार आहे. यासाठी ‘एमकेसीएल’च्या सुविधांचा वापर करण्यात येणार आहे. याअगोदर विद्यापीठाने आॅनलाईन फेरमूल्यांकनाचा प्रयोग केला होता. परंतु त्यात फारसे यश मिळाले नव्हते. त्यामुळे यंदा ही प्रक्रिया सुरळीत पार पडणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. परंतु विद्यापीठ यासाठी पूर्ण तयारी करत असून हा प्रयोग यशस्वी करून दाखविणारच असा दावा प्र-कुलगुरू डॉ.येवले यांनी केला आहे.