नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाचा आरोप : कंपन्यांनीच व्हॅट भरावानागपूर : होलसेल व्यापारी अथवा कंपन्यांच्या स्टॉकिस्टने वस्तूंवर व्हॅट भरला नसेल तर त्यासाठी किरकोळ व्यापाऱ्यांना जबाबदार धरले जाते. हा कायदा राज्यात राबविला जात आहे. विक्रीकर विभाग लहान व्यापाऱ्यांना नोटीस देऊन त्रास देत आहे. व्हॅटची शिक्षा आम्हालाच का, असा सवाल नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाने केला आहे. कर वसुलीसाठी शासनाचा त्रास तर दुसरीकडे मोठ्या कंपन्यांच्या मनमानी व्यवहारामुळे लहान किराणा व्यापारी त्रस्त आहेत. वस्तूंची विक्री करताना कंपन्या किरकोळ व्यापाऱ्यांची विनवणी करतात. पण एखादी वस्तू पॅकिंगमध्ये खराब निघाली किंवा तेल कंपन्यांचे पॅकेट पेटीमध्येच लिकेज असेल तर कंपन्या तो माल परत घेत नाही. त्याचा त्रास लहान व्यापाऱ्यांना सहन करावा लागतो. याविरोधात आमचा लढा सुरू असल्याची माहिती नागपूर चिल्लर किराणा व्यापारी संघाचे महासचिव ज्ञानेश्वर रक्षक यांनी लोकमतशी बोलताना दिली.रक्षक म्हणाले, नागपुरातील होलसेल किराणा व्यवसाय आजही त्याच जुन्या परंपरा कवटाळत सुरू आहे. व्यापारी वस्तूंचे भाव सांगतात, पण त्यात अनेक खर्च जोडले जातात. याशिवाय ‘असोसिएशन टॅक्स’सुद्धा लहान व्यापाऱ्यांकडून वसूल केला जातो. यासाठी विविध व्यापारी संघटनांची शिखर संघटना नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सकडे तक्रार केली, पण या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या तक्रारीकडे सपशेल कानाडोळा केला आहे. लहान व्यापारी केवळ आंदोलनावेळीच आठवताच का, असा उपरोधिक सवालही रक्षक यांनी उपस्थित केला आहे. व्यापारी एकता म्हणून अन्याय सहन करून आम्ही व्यापाऱ्यांची ताकद दाखवित असतो. बिलाच्या नावावर आम्हाला अनेक कर द्यावे लागतात. हे आता बंद व्हावे, असे रक्षक म्हणाले. (प्रतिनिधी)
किरकोळ व्यापाऱ्यांना व्हॅटची शिक्षा!
By admin | Updated: May 25, 2015 03:00 IST