वसुंधरा राजे यांनी घेतली सरसंघचालकांची भेट
By Admin | Updated: December 12, 2015 05:40 IST2015-12-12T05:40:53+5:302015-12-12T05:40:53+5:30
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली.

वसुंधरा राजे यांनी घेतली सरसंघचालकांची भेट
नागपूर : राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत, सरकार्यवाह भय्याजी जोशी यांची सदिच्छा भेट घेतली. सुमारे १५ मिनिटे त्यांनी सरसंघचालकांसमवेत चर्चा केली व सायंकाळी ७.३० च्या सुमारास त्या तेथून रवाना झाल्या. या भेटीतील चर्चेचा तपशील कळू शकला नाही. परंतु विकासाच्या नावाखाली राजस्थान सरकारने जयपूर येथील अनेक मंदिरे पाडली होती. याला संघ परिवारातील संस्थांनी विरोध केला होता व संघानेदेखील यासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. या मुद्यावर राजस्थानमध्ये आंदोलनदेखील झाले होते व संघ स्वयंसेवकांनी यात पुढाकार घेतला होता. त्यानंतर वसुंधरा राजे यांनी शुक्रवारी प्रथमच संघ मुख्यालयाला भेट दिली हे विशेष. ‘अॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनासाठी त्या नागपुरात आल्या होत्या. (प्रतिनिधी)