वासवानीच्या एन्ट्रीला ब्रेक
By Admin | Updated: July 11, 2014 01:27 IST2014-07-11T01:27:25+5:302014-07-11T01:27:25+5:30
नासुप्रचा लाचखोर अधिकारी नानक वासवानी याला पुन्हा सेवेत घेण्यासाठी विश्वस्त मंडळाने यापूर्वी ठराव पारित केला होता. मात्र, यानंतर लोकमतने या विषयाला वाचा फोडल्यानंतर विश्वस्तांनीही

वासवानीच्या एन्ट्रीला ब्रेक
विश्वस्तांचा विरोध : पुनर्स्थापनेचा विषय नामंजूर
नागपूर : नासुप्रचा लाचखोर अधिकारी नानक वासवानी याला पुन्हा सेवेत घेण्यासाठी विश्वस्त मंडळाने यापूर्वी ठराव पारित केला होता. मात्र, यानंतर लोकमतने या विषयाला वाचा फोडल्यानंतर विश्वस्तांनीही सामाजिक दबावापोटी आपली भूमिका बदलली. गुरुवारी विश्वस्त मंडळाच्या बैठकीत जुनी चूक सुधारत विश्वस्तांनी वासवानीच्या पुनर्स्थापनेला एकमुखाने विरोध केला. या संबंधीचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. त्यामुळे आता वासवानीच्या नासुप्रमधील एन्ट्रीला कायमचा ब्रेक लागला आहे.
सात वर्षांपूर्वी लाच घेताना रंगेहात सापडलेला नागपूर सुधार प्रन्यासचा निलंबित अधीक्षक अभियंता नानक वासवानी याच्या सेवानिवृत्तीला तीन महिने शिल्लक राहिले असताना त्याला पुन्हा सेवेत घेण्यासाठी नासुप्र विश्वस्त मंडळाच्या २८ मे रोजीच्या बैठकीत ठराव संमत केला होता. यानंतर लोकमतने ‘वासवानी नासुप्रचा जावई आहे का? या मथळ्याखाली विशेष लेख प्रसिद्ध करीत या प्रकाराला वाचा फोडली. लोकमतचा दणका कामी आला. वासवानीची नासुप्रतील एन्ट्री रोखण्यासाठी एक जनचळवळ उभी झाली. नासुप्र प्रशासन व विश्वस्तांवर सामाजिक दबाव वाढला. शेवटी विश्वस्त आ. पडोळे, डॉ. छोटू भोयर यांनी स्पष्ट केले की, वासवानीच्या फेरनियुक्तीचा प्रस्ताव हा कोणत्याही विश्वस्ताच्या शिफारशीने सभेपुढे आला नाही. कार्यालयाने सादर केलेल्या विषयावर चर्चा व्हायला हवी होती. दुर्दैवाने ती झाली नाही. या विषयावर कार्यालयाचे मत घेण्यात आले व नियमाप्रमाणे कारवाई व्हावी, असे मत आम्ही मांडले. असे असले तरी पुढील बैठकीत जेव्हा या विषयाचे इतिवृत्त कायम करण्यासाठी ठेवले जाईल, तेव्हा या विरोध करून ते मंजूर होऊ दिले जाणार नाही. कायद्यात तरतूद असली तरी वासवानीला पुन्हा पदावर रुजू होऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. आजच्या बैठकीत संबंधित निर्णयाचे इतिवृत्त कायम करण्याचा विषय होता. याला डॉ. छोटू भोयर, आ. दीनानाथ पडोळे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांच्यासह सर्वांनीच एकमुखाने विरोध केला. (प्रतिनिधी)
वासवानीच्या मुलाबाबत निर्णयाचा अधिकार नाही
याच प्रस्तावाच्या दुसऱ्या भागात लाचखोर वासवानी याच्या मुलावर गुन्हे दाखल करण्यासाठी अॅन्टी करप्श्न ब्युरोला परवानगी देण्याचाही विषय होता. मात्र, वासवानीचा मुलगा हा नासुप्रचा कर्मचारी किंवा अधिकारी नाही. त्याचा नासुप्रशी कुठलाही संबंध नाही. त्यामुळे बाहेरच्या व्यक्तीवर गुन्हे दाखल करावे की नाही याबाबतची परवानगी देण्याचा अधिकार नासुप्रला नाही. ही बाब विचारात घेत मुलावर गुन्हे दाखल करण्यास परवानगी देणे हे आपल्या कार्यकक्षेबाहेरचे आहे, याबाबत तपास यंत्रणेनेच योग्य तो निर्णय घ्यावा, असा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला.