भगवान महावीर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
By Admin | Updated: March 25, 2015 02:24 IST2015-03-25T02:24:59+5:302015-03-25T02:24:59+5:30
भगवान महावीर यांची २६१४ वी जयंती व श्री जैन सेवा मंडळाचा अमृत महोत्सव यानिमित्त २६ मार्च ते २ एप्रिलपर्यंत विविध ७५ कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

भगवान महावीर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
नागपूर : भगवान महावीर यांची २६१४ वी जयंती व श्री जैन सेवा मंडळाचा अमृत महोत्सव यानिमित्त २६ मार्च ते २ एप्रिलपर्यंत विविध ७५ कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
संत सुवीरसागरजी महाराज, मंडळाचे अध्यक्ष मनीष मेहता व प्रचारमंत्री रवींद्रकुमार आग्रेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत कार्यक्रमांची विस्तृत माहिती दिली. २६ व २७ मार्च रोजी इतवारीतील इंद्र भवन येथे महिला समितीचे कार्यक्रम होतील. २८ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता अहिंसा भवन (इतवारी) येथून जैन तीर्थ भावयात्रा काढण्यात येईल. दरम्यान सर्व जैन मंदिरांना भेट देण्यात येईल. संघपती सुरेश आग्रेकर, संघपती आनंद सवाने, गणेश जैन, मंजू जैन, नगरसेविका आभा पांडे, डॉ. विनय रोडे आदी उपस्थित राहतील. श्री दिगंबर जैन सेनगण मंदिरात भावयात्रेचा समारोप होईल. याप्रसंगी सुरेश आग्रेकर, उदय जोहरापूरकर व अरुण जैन यांच्यातर्फे अल्पोपहार वितरित केला जाईल. शरद मचाले व दीपक शेंडेकर भावयात्रेचे संयोजक आहेत. २९ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता शहीद चौकातून डॉ. सुरेशचंद जैन यांच्या नेतृत्वात अहिंसा स्कूटर रॅली काढण्यात येईल. आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखविण्यात येईल. रॅली शहरातील सर्व दिगंबर व श्वेतांबर जैन मंदिरांना भेट देत मेयो रुग्णालयात पोहोचेल. या ठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सक यू. बी. नवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल.
३१ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता चिटणीस पार्क येथे आयोजित भजन संध्या कार्यक्रमात संगीतकार रुपेश जैन टिकमगडवाले व त्यांचे सहकारी श्रवणीय भजन सादर करतील. १ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता याच ठिकाणी दिगंबर जैन महासमितीतर्फे रोग निदान शिबिर आयोजित करण्यात येईल. सायंकाळी ७.३० वाजता अहमदाबाद येथील नीलेश राणावत मातृ-पितृ वंदना सादर करतील. निखिल कुसुमगर अध्यक्षस्थानी तर, कांचनताई गडकरी प्रमुख अतिथी राहतील.
२ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता दिगंबर जैन परवार मंदिर ट्रस्ट, परवारपुरा, इतवारी येथून महावीर जन्म कल्याणक शोभायात्रा काढण्यात येईल. सकाळी ९.३० वाजता चिटणवीस पार्क येथे भगवान महावीर यांचा अभिषेक व पूजन करण्यात येईल. यानंतर मुनिश्री सुवीरसागर महाराज व मुनिराज प्रशमरति विजय म. सा. यांची प्रवचने होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्षस्थानी तर, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रसायने व खते राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभा खासदार विजय दर्डा, खासदार अजय संचेती, खासदार कृपाल तुमाने, नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष निशाताई सावरकर प्रमुख अतिथी राहतील.
सकाळी ११ वाजता भारतीय जैन संघटन व पुलक जैन चेतना मंच महाल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने नि:शुल्क नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात येईल. सकाळी ११.३० वाजता स्वामी वात्सल्य कार्यक्रम होईल. सायंकाळी ७.३० वाजता चिटणवीस पार्क येथे सामूहिक भजन स्पर्धा आयोजित करण्यात येईल. दरवर्षी होणारा कोठारी ज्वेलर्स अहिंसा पुरस्कार वितरण समारंभ एप्रिलच्या शेवटी घेण्यात येईल असे सांगून कार्यक्रमांत जास्तीतजास्त भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले.
पत्रकार परिषदेत सुमतलल्ला जैन, महेंद्र कटारिया, डॉ. संतोष मोदी (सर्व मंडळाचे माजी अध्यक्ष ), दिलीप गांधी, सतीश पेंढारी, हिराचंद मिश्रीकोटकर, विजय उदापूरकर, शरद मचाले, संजय टक्कामोरे, जेठमल डागा, जितेंद्र तोरावल, पंकज बोहरा, जयकुमार जैन, संजय नेताजी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)