महिलेच्या मृत्यूनंतर विनस हॉस्पिटलमध्ये तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:08 IST2021-04-12T04:08:13+5:302021-04-12T04:08:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त नातेवाइकांनी छावणीतील विनस हॉस्पिटलमध्ये जोरदार गोंधळ घालून तोडफोड केली. ...

महिलेच्या मृत्यूनंतर विनस हॉस्पिटलमध्ये तोडफोड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त नातेवाइकांनी छावणीतील विनस हॉस्पिटलमध्ये जोरदार गोंधळ घालून तोडफोड केली. रविवारी दुपारी झालेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
छावणी चाैकाजवळ विनस क्रिटिकल केअर हॉस्पिटल आहे. येथे जरीपटक्यातील एका ४० वर्षीय कोरोनाबाधित महिलेवर उपचार सुरू होते. रविवारी सकाळी महिलेची प्रकृती ढासळली. ते कळल्यानंतर नातेवाइकांनी रोष व्यक्त करणे सुरू केले. दुपारी ३.४५ च्या सुमारास महिलेचा मृत्यू झाल्याचे कळताच संतप्त नातेवाइकांनी हॉस्पिटलवर दगडफेक करून तोडफोड केली. यामुळे छावणी परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच सदरचे ठाणेदार बकाल आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवून तोडफोड करणाऱ्या आरोपींची शोधाशोध सुरू केली. त्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाची तक्रार नोंदवून घेत बेकायदेशीरपणे मंडळी जमवून दंगा केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.
---
आठ दिवसांतील दुसरी घटना
रुग्ण दगावल्यानंतर हॉस्पिटलमध्ये तोडफोड करण्याची आठ दिवसांतील ही नागपुरातील दुसरी घटना आहे. यापूर्वी पाचपावलीतील एका हॉस्पिटलमध्ये संतप्त नातेवाइकांनी अशीच तोडफोड करून रिसेप्शनमध्ये आग लावली होती. उपचाराच्या नावाखाली काही खासगी हॉस्पिटलचे प्रशासन रोज हजारो रुपये उकळून योग्य तसा उपचार करीत नसल्याची अनेकांनी ओरड आहे.
----