मेट्रो रिजन आराखड्याविरोधात मतदानातून आक्रोश

By Admin | Updated: November 30, 2015 02:41 IST2015-11-30T02:41:27+5:302015-11-30T02:41:27+5:30

नागपूर सुधार प्रन्यास(नासुप्र)तर्फे तयार करण्यात आलेला आराखडा अन्यायकारक असून, आराखड्यात चुकीचे आरक्षण करण्यात आल्याने, मेट्रो रिजन आराखडा रद्द करावा, ..

Vandalism against the Metro Ridge Planet | मेट्रो रिजन आराखड्याविरोधात मतदानातून आक्रोश

मेट्रो रिजन आराखड्याविरोधात मतदानातून आक्रोश

पहिल्याच दिवशी २.५ लाख लोकांचा सहभाग : आराखडा रद्द करण्याची मागणी
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यास(नासुप्र)तर्फे तयार करण्यात आलेला आराखडा अन्यायकारक असून, आराखड्यात चुकीचे आरक्षण करण्यात आल्याने, मेट्रो रिजन आराखडा रद्द करावा, या मागणीसाठी जय जवान जय किसान या संघटनेतर्फे मतदान घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील ९ तालुक्यात मतदानाला सुरूवात झाली असून, पहिल्याच दिवशी २.५ लाख लोकांनी मतदानात सहभाग घेऊन भरभरून मतदान केल्याची माहिती संघटनेचे संयोजक प्रशांत पवार यांनी दिली.
नागपूर मेट्रोरिजन अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील ७२० गावांमध्ये ही जनमत चाचणी घेण्यात येत आहे. २९ नोव्हेंबरपासून जनमत चाचणीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. रविवारी जवळपास ३०० गावात मतदान घेण्यात आले. शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा, ग्रामपंचायत जिल्हापरिषदेचे अस्तित्व संपुष्टात आणणारा, दोन लाख कुटुंबांना बेघर करणारा नागपूर महानगर प्रारुप विकास आराखडा (मेट्रो रिजन) रद्द झाला पाहिजे. अशी भूमिका घेऊन जय जवान जय किसान संघटनेतर्फे जिल्ह्यातील उमरेड, कुही, कामठी, पारशिवणी, कळमेश्वर, हिंगणा, मौदा, सावनेर व नागपूर ग्रामिण तालुक्यात मतदान घेतले. मतदानासाठी गावकऱ्यांमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद दिसून आला. काही गावांमध्ये शंभरटक्के मतदान झाल्याची माहिती पवार यांनी दिली. ५ डिसेंबरपर्यंत मेट्रो रिजन अंतर्गत येणाऱ्या ७२० गावांमध्ये मतदान होणार आहे. मेट्रोरिजन आराखडा अन्यायकारक आहे का? असा प्रश्न गावागावातील नागरिकांना विचारण्यात येतो आहे. यासाठी १० लाख बॅलेट पेपर छापण्यात आले आहे. विकास आराखड्यात शेतकऱ्यांच्या जमिनीवर ग्रीन झोन टाकण्यात आल्याने या जमिनींच्या किंमती घसरल्या आहेत. शेत जमिनींना कवडीमोल किंमत प्राप्त झाली असल्याने शेतकऱ्यासमोर संकट निर्माण झाले आहे. गावातील प्रत्यक्ष स्थितीची माहिती न घेता नागपूर सुधार प्रन्यासने हालक्रो कंपनीकडून हा आराखडा तयार केला आहे. महानगर क्षेत्रातील दोन लाख कुटुंब बेघर होणार आहेत.
ज्यांनी एनएटीपी न करता प्लॉट घेतले, त्यांना नियमित करण्याची कुठलीही तरतूद आराखड्यात नाही. महाराष्ट्र रिजनल टाऊन प्लॅनिंग अ‍ॅक्ट चे उल्लंघन करून, हा आराखडा तयार करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

निवडणुकीचा निकाल मुख्यमंत्र्यांपुढे ठेवू
मेट्रो रिजन विकास आराखड्यात चुकीचे आरक्षण टाकण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचे नुक सान झाले आहे. अनेक कुटुंबांना बेघर होण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे मेट्रोरिजन आराखड्याविरोधात गावागावतून मतदान घेऊन, गावकऱ्यांची भूमीका मुख्यमंत्र्यांपुढे मांडण्यात येणार आहे. तसेच उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात येणार असल्याचे संघटनेचे संयोजक प्रशांत पवार यांनी सांगितले.
१० डिसेंबरला निकाल
१००० कर्मचारी मतदानाच्या कामात सहभागी आहे. निवडणूक प्रणालीची योग्य अंमलबजावणी व्हावी म्हणून माजी कुलगुरु व कृषितज्ज्ञ शरद निंबाळकर यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे. १० डिसेंबर रोजी संपूर्ण निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात येणार आहे.

Web Title: Vandalism against the Metro Ridge Planet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.