सहा स्कूलबससह व्हॅन जप्त
By Admin | Updated: July 14, 2015 02:55 IST2015-07-14T02:55:36+5:302015-07-14T02:55:36+5:30
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कूल बससाठी नवीन नियम तयार करण्यात आले आहेत. याच्या अंमलबजावणीला तीन

सहा स्कूलबससह व्हॅन जप्त
नागपूर : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्कूल बससाठी नवीन नियम तयार करण्यात आले आहेत. याच्या अंमलबजावणीला तीन वर्षे होत असतानाही अनेक शाळा नियम पाळत नसल्याचे चित्र आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरने सोमवारी स्कूल बस व व्हॅनची तपासणी केली असता दोन स्कूल बस व चार स्कूल व्हॅनमधील वेग नियंत्रक नादुरुस्त असल्याचे दिसून आले. याशिवाय मीटरने न चालणाऱ्या ११ आॅटोरिक्षाही जप्त केल्या.
विद्यार्थी वाहतुकीला संवेदनशील वाहतूक म्हणून ओळखले जाते. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूक करणाऱ्या स्कूल बस व व्हॅनसाठी विशिष्ट नियमावली तयार करण्यात आली आहे. यात भरधाव स्कूल बस व व्हॅनला मर्यादा पडाव्यात म्हणून शासनाने महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या स्कूल बसचा वेग ४० तर हद्दीच्या बाहेर ५० किलोमीटर प्रति तासापेक्षा वेग नसावा, यासाठी बसमध्ये वेगमर्यादा नियंत्रक (स्पीड गव्हर्र्नर) बसविण्याचे निर्देश दिले. परंतु अनेक वाहनचालक पैशाच्या हव्यासापोटी जास्तीतजास्त फेऱ्या होण्याच्या दृष्टीने स्पीड गव्हर्नर तोडतात. ‘लोकमत’ने हा प्रकार नुकताच उघडकीस आणला. याची दखल आरटीओ शहर कार्यालयाने घेऊन स्कूल बस व व्हॅन तपासणी मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी कळमेश्वर रोडवर वाहनांची तपासणी केली असता दोन स्कूल बस व चार व्हॅनमधील स्पीड गव्हर्नर तोडलेले आढळून आले. ही वाहने जप्त केली आहेत. आॅटोरिक्षा मीटरने चालत नसल्याच्या आरटीओकडे तक्रारी वाढल्या आहेत. याची दखल घेत १५ आॅटोंना कारणे दाखवा नोटीस देऊन यातील ११ आॅटो जप्त केल्या आहेत. ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांच्या मार्गदर्शनात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली.(प्रतिनिधी)