व्हॅलेण्टाइन स्पेशल; व्यक्त होण्यासाठी जोडीदाराला द्या दिलखुलास आलिंगन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 07:00 IST2022-02-12T07:00:00+5:302022-02-12T07:00:14+5:30
Nagpur News आलिंगन ही अशी कृती आहे, ज्याद्वारे संबंधितावर असलेला तुमचा अतुट असा विश्वास व्यक्त होतो.

व्हॅलेण्टाइन स्पेशल; व्यक्त होण्यासाठी जोडीदाराला द्या दिलखुलास आलिंगन
नागपूर : हे गरजेचे नाही की प्रेमात पडल्यावरच तुम्हाला आलिंगन देण्याचा-घेण्याचा अधिकार मिळतो. आलिंगन ही सर्वसमावेशक कृती आहे, ज्याद्वारे तुम्ही आपला स्नेह व्यक्त करू शकता. आलिंगन ही अशी कृती आहे, ज्याद्वारे संबंधितावर असलेला तुमचा अतुट असा विश्वास व्यक्त होतो. बाहेरच्या जगात प्रियकर-प्रेयसी, मित्र-मैत्रीण, प्रसंगी गुरु-शिक्षक तर कौटुंबिक जगात आई-वडील, बहीण-भाऊ, आजी-आजोबा, काका-काकू, मामा-मामी, आत्या-मावशी या नात्यांची विण विश्वासातून जपली जाते आणि आनंद वा दु:ख, यश-अपयशाच्या प्रसंगात कुणाला तरी घट्ट मिठी मारून व्यक्त होण्याची क्रिया म्हणजेच आलिंगन होय. जगभरात प्रेमवीरांचा व्हॅलेण्टाइन वीक साजरा होत आहे आणि त्याच वीकमधला ‘हग डे’ शनिवारी, १२ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे.
मिठी मारण्याचे आरोग्यदायी लाभ
हृदयाचे आरोग्य उत्तम : हृदय उत्तम ठेवण्यासाठी आलिंगन ही कृती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. जवळच्या व्यक्तीला मिठी मारल्याने शरीरातील लव्ह हार्मोन ऑक्सिटोसिनचा स्तर वाढतो आणि त्यामुळे हृदय उत्तम राहतो.
ब्लड प्रेशर कमी होते - वैज्ञानिकांच्या संशोधनानुसार मिठी मारल्याने शरीरात ऑक्सिटोसिन हार्मोन प्रसारित होत असल्याने ब्लड प्रेशर कमी होते.
तणावापासून मुक्ती - विशेष व्यक्तीला आलिंगन दिल्याने स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलचा स्तर कमी होतो. त्यामुळे तणावापासून मुक्ती मिळते.
स्मरणशक्ती वाढते - जवळच्या व्यक्तीला मिठी मारल्याने तणाव कमी होतो आणि त्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
आजारांचा धोका कमी - आलिंगन दिल्याने तणाव कमी होतो, भावना व्यक्त करण्यास शब्दांची गरज राहत नाही. त्यामुळे, व्यक्ती स्वत:ला कम्फर्ट समजतो आणि अनेक आजारांपासून लांब राहण्याची क्षमता वाढवतो.
शब्दविरहित भावना
कोणीही कुणालाही ऊठसूट आलिंगन देत नाही किंवा देऊ शकत नाही. अत्यंत जवळचा, विश्वासपात्र, मार्गदर्शक अशा व्यक्तीलाच आलिंगन देण्यास व्यक्ती धजावतो. ही अतिशय तरल भावना असते. सुख-दु:खात, यश-अपयशाच्या प्रसंगी व्यक्ती बोलण्यास असमर्थ असतो. अशा वेळी कोणीतरी आपल्या भावना न बोलताही समजून घेणारा असतो आणि त्यालाच मिठी मारावीशी वाटते. ही एक सहज प्रक्रिया आहे.
........