व्हॅलेंटाईन डे; प्रेमवीरांची तयारी जोमात, मात्र धाकधूक कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 07:00 IST2021-02-14T07:00:00+5:302021-02-14T07:00:07+5:30

Nagpur news वर्षभर मनाच्या कप्प्यात विशेष व्यक्तीविषयी साठवून ठेवलेली सुकोमल भावना व्यक्त होण्यासाठी हल्ली हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तोच दिवस शनिवारी साजरा होणार आहे.

Valentine's Day; The preparations of the lovers are in full swing, but the pressure is still there | व्हॅलेंटाईन डे; प्रेमवीरांची तयारी जोमात, मात्र धाकधूक कायम

व्हॅलेंटाईन डे; प्रेमवीरांची तयारी जोमात, मात्र धाकधूक कायम

ठळक मुद्देहळव्या प्रेमाचा आतुर दिवस, वेड लागले प्रेमाचे!धर्मवीरही पाश्चात्त्य संस्कृतीविरोधासाठी सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : प्रेमभावनेला कसलाच अडसर नसतो, एका दिवसाचा तर नाहीच नाही. मात्र, हळुवार व्यक्त होण्याला निमित्त लागते आणि ते निमित्त सकारात्मकतेने साध्य झाले तर सेलिब्रेशन होते. व्हॅलेंटाईन डे, हा असाच एक सेलिब्रेशनचा दिवस. प्रेमवीरांसाठी जगाने मान्य केलेला हक्काचा दिवस. वर्षभर मनाच्या कप्प्यात विशेष व्यक्तीविषयी साठवून ठेवलेली सुकोमल भावना व्यक्त होण्यासाठी हल्ली हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तोच दिवस शनिवारी साजरा होणार आहे. प्रेमाचे वेड लागलेले अनेक प्रेमवीर सज्ज झाले आहेत. व्यावसायिकता जपणारेही साजोसामानासह रेडी आहेत.

प्रेम सर्वव्यापी आहे आणि वाऱ्याला ज्याप्रमाणे अडवून ठेवता येत नाही, त्याचप्रमाणे प्रेमभावनेलाही अडवता येत नाही. वाऱ्याप्रमाणे प्रेमभावना आपला मार्ग हुडकून काढतेच. आता हेच बघा ना, कोरोना काळात लागू झालेल्या टाळेबंदीने सर्वांनाच स्तब्ध करून सोडले हाेते. प्रेमवीरही कुलूपबंद झाले होते. मात्र, इच्छा तेथे मार्ग अशा तऱ्हेने ऑनलाइन प्रेम सुरू हाेतेच. हल्ली ऑनलाइन-बिनलाइन हा विषय खूप कौतुकाचा राहिला नाही. मात्र, नव्याने सुरू झालेल्या नात्यांची वीण घट्ट करायची असेल तर प्रत्यक्ष भेट महत्त्वाची असते. मात्र, ही अंधश्रद्धा पार मोडून टाकली गेली ती याच काळात. उलट, ‘विरहात खुलते प्रेम अधिक मोलाचे’ ही प्राचीन म्हण खऱ्या अर्थाने साधली गेली तीही याच काळात. अर्थातच टाळेबंदी आता संपली आहे. मग, तब्बल आठ-नऊ महिने गोठवून ठेवलेल्या अति तरल अशा या भावनेला वाट मोकळी करणारा व्हॅलेंटाईन डे हा ऐतिहासिक ठरणार आहे. कदाचित वर्तमानातील धरसोड वृत्तीच्या पलीकडे जाऊन एकमेकांचे कायमचे होऊन जाण्याची अगतिकता व्यक्त होण्याची शाश्वती, या दिवसाला अनन्य साधारण असे अधिष्ठान देईल.

त्याच अनुषंगाने प्रेमवीर सज्ज आहेत. रोझ डेपासून सुरू झालेला हा व्हॅलेंटाईन विक आज सिद्धतेवर येऊन ठेपला आहे. व्यक्त होण्यापासून ते तोंड गोड करणे, भेट देणे, आलिंगन, चुंबनादी सोपस्कार पार पाडल्यावर तरुणाई जल्लोषासाठी सज्ज झाली आहे. हा जल्लोष नागपुरात साधारणत: शहरातील वेगवेगळ्या उद्यानांमध्ये साजरा होतो. वस्ताद लहूजी साळवे अर्थात अंबाझरी उद्यान, फुटाळा तलाव, तेलंगखेडी, बॉटनिकल गार्डन ही प्रेमवीरांची भेटण्याची हक्काची ठिकाणे. यंदा मात्र, ही ठिकाणे तेवढीशी मोकळी असतील असे नाही. कोरोनाचा संसर्ग अजूनही संपलेला नाही. त्यामुळे, उत्सवी प्रसंगात आजकाल ही ठिकाणे बंद ठेवण्यात येत आहेत. तरी मार्ग तर काढला जाणारच. पर्यटन व्यवसाय सुरू झाल्याने अनेक मंडळी शहराच्या बाहेर, पण जवळ असणाऱ्या ठिकाणी जाणार आहेत. रामटेक, खिंडसी, वॉटर पार्क, हिंगणा परिसरातील नैसर्गिक ठिकाणे व लहान लहान वॉटर फॉल्स आदी ठिकाणी ही मंडळी जमणार आहेत. जवळच पेंच, ताडोबा आदी जंगलभ्रमंतीला पसंतीस असणारी स्थळेही सज्ज आहेतच. शिवाय, शहरातील सर्वच हॉटेल्सनी व्हॅलेंटाईन सेलिब्रेशनची विशेष व्यवस्था केली आहे. कपल्ससाठी विशेष प्रयोजन करण्यात आले आहे. बऱ्याच उत्साही प्रेमवीरांनी रात्री १२च्या ठोक्यालाच सेलिब्रेशनची सुरुवात केली आहे.

ही सगळी तयारी सुरू असतानाच संस्कृतिरक्षक धर्मवीरही सज्ज आहेतच. पाश्चात्त्य संस्कृतीला थारा नको आणि प्रेमदिनाच्या नावे होणाऱ्या बीभत्स कृत्याचा विरोध म्हणून शिवसेना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आदी संस्कृतिरक्षकांनी इशाऱ्याची पत्रके वाटली आहेतच. एवढ्या वर्षांच्या अनुभवातून संस्कृतिरक्षकांचा हा धोका सर्वच प्रेमवीरांना ठाऊक आहे. त्यामुळे, तेवढी तयारी प्रेमवीरांचीही आहेच.

पोलीस पथक सज्ज

व्हॅलेंटाईन डेला दरवर्षी होणारी हुल्ल्डबाजी, दंगल, पळापळ बघता पोलीस यंत्रणाही सज्ज आहेच. विशेष म्हणजे, हा दिवस रहदारीबाबत जनजागृती म्हणूनही पोलीस यंत्रणा पाळत असते. स्वत:च पोलिसांकडून नागरिकांना गुलाबपुष्प देऊन प्रेमदिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात आणि सामाजिक नैतिकता जपण्याचे आवाहन केले जाते. एकीकडे ही सहृदयता दर्शवितानाच हुडदंग माजवणाऱ्यांना दंडूकाही देण्यास पोलीस सज्ज असतात.

संस्कृतिरक्षक मवाळ झाले

एरवी संस्कृतिरक्षक व्हॅलेंटाईन विकच्या पहिल्या दिवसापासूनच सज्ज असतात. मात्र, यंदा तसे चित्र दिसून आलेले नाही. अजूनही धमकावण्याचे इशारे जाहीर झालेले नाही. गेल्या दोन वर्षांपासून ही मंडळी अतिशय सौम्य झाल्याचे दिसून येत आहे. एरवी या दिवशी उद्यानात दिसणाऱ्या कपल्सचे जबरी विवाह लावून देण्याचे कार्य या संस्कृतिरक्षकांकडून होत होते, हे विशेष.

............

Web Title: Valentine's Day; The preparations of the lovers are in full swing, but the pressure is still there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.