इंदिरा गांधी रुग्णालयावर लसीकरणाने ताण वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:13 IST2021-03-04T04:13:09+5:302021-03-04T04:13:09+5:30

नागपूर : कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी शहरातील आरोग्य केंद्र आणि रुग्णालयांच्या नावांची यादी तीन दिवसांपूर्वीच जाहीर झाली आहे. या ...

Vaccination at Indira Gandhi Hospital increased stress | इंदिरा गांधी रुग्णालयावर लसीकरणाने ताण वाढला

इंदिरा गांधी रुग्णालयावर लसीकरणाने ताण वाढला

नागपूर : कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी शहरातील आरोग्य केंद्र आणि रुग्णालयांच्या नावांची यादी तीन दिवसांपूर्वीच जाहीर झाली आहे. या सर्वच ठिकाणी नागिरकांची लस घेण्यासाठी प्रचंड गर्दी दिसली असली तरी इंदिरा गांधी रुग्णालयावर या लसीकरण केंद्राचा चांगलाच ताण वाढल्याचे दिसत आहे.

महानगर पालिकेने आधी जाहीर केलेल्यांपैकी सीम्स रुग्णालय, वोक्हार्ट हॉस्पिटल आणि ऑरेंज सिटी हॉस्पिटल या तीन रुग्णालयांमधून मिळणारी लसीकरणाची सेवा बंद केली आहे. त्यामुळे इंदिरा गांंधी रुग्णालयावर एकाएकी लसीकरणाचा ताण वाढला आहे. बुधवारी सकाळी लस घेण्यासाठी नावनोंदणी करणाऱ्यांची आणि आणि टोकन घेणाऱ्यांची प्रचंड गर्दी उसळली होती. ती दुपारनंतरही कायमच होती. मंगळवारी या केंद्रावर ३२७ जणांचे लसीकरण करण्यात आले. बुधवारी दुपारी पावणेदोन वाजता हा आकडा १४४ वर गेला होता. गर्दीचा अंदाज न आल्याने बुधवारी रुग्णालयाचे नियोजन कोलमडून पडले. प्रचंड गर्दी झाली. ज्येष्ठ नागरिकांच्या नातेवाईकांचा रोष वाढल्याने झोनल आयुक्त प्रकाश वऱ्हाडे यांनी पोलिसांची मदत घेऊन गर्दी नियंत्रणात आणली. सेवा देणारे अर्धसैनिक बलाचे कर्मचारी नियुक्त केले. दुपारनंतर पेंडाॅल उभारण्याचा निर्णय घेतला. फिजिकल डिस्टन्स राखले जावे म्हणून गोल आखण्यात आले.

रुग्णालयातील चमू आपल्या परीने सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. लस घेणाऱ्यांना टोकन क्रमांक दिला जात आहे. मात्र येथील शिपायांना ओरडून तो सांगावा लागत असूनही गर्दीच्या आवाजामुळे अनेकांना कोणत्या क्रमांकाचा पुकारा झाला हे कळतच नाही. त्यामुळे वारंवार गोंधळ उडत आहे.

...

दक्षतेअभावी धोका वाढतोय !

याच रुग्णालयात कोविड सेंटर आहे. ३५ रुग्ण उपचारात आहेत. कोरोना ब्लड टेस्टिंग सेंटरही येथे आहे. त्यामुळे नमुने देणाऱ्या रुग्णांचीही वर्दळ येथे असते. लस टोचून घेण्यासाठी आलेले बहुतेक ज्येष्ठ नागिरक आहेत. अनेकांसोबत नातेवाईकही आहेत. प्रवेशद्वार एकच असल्याने संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आधिक आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून कोविड रुग्ण तसेच रक्त नमुने देण्यासाठी येणाऱ्यांना रुग्णालयाच्या मागील दाराने येण्यास सुचविले जात आहे. मात्र प्रवेशद्वारावर तशी सूचना येणाऱ्यांना दिली जात नसल्याने परिस्थिती गंभीर आहे.

...

गर्दीत पडतेय भर

वेळेवर रजिस्ट्रेशन करून लस घेण्यासाठी येणाऱ्यांसोबतच कोविड ॲपवरून रजिस्ट्रेशन झालेल्यांचीही येथे रोज गर्दी वाढत आहे. एवढेच नाही तर लसीचा दुसरा डोज घेणाऱ्यांचीही या गर्दीत भर पडत आहे. ज्येष्ठांची गर्दी अधिक असल्याने त्यांच्या मदतीसाठी येणाऱ्या नातेवाईकांची संख्याही बरीच आहे.

...

Web Title: Vaccination at Indira Gandhi Hospital increased stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.