आंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्रात लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST2021-06-20T04:07:13+5:302021-06-20T04:07:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्र, माहिती व मार्गदर्शन केंद्राचे संस्थापक, मुस्लीम समाजातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील मार्गदर्शक ...

आंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्रात लसीकरण मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्र, माहिती व मार्गदर्शन केंद्राचे संस्थापक, मुस्लीम समाजातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील मार्गदर्शक मौलाना सय्यद आलमगीर अशरफ यांनी शनिवारी कामठी रोड येथील आंतरराष्ट्रीय सुन्नी केंद्रात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. मुस्लीम समाजातील सर्व वयोगटातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कोविड लसीकरण हा कोरोनामुक्तीचा एकमेव मार्ग आहे. समाजात याबाबत काही असामाजिक तत्त्व अंधश्रद्धा पसरवित असल्याने अशा भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये, स्वत:ची तसेच कुटुंबाची काळजी घ्यावी. शासनाच्या निदेशाचे पालन करावे, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला. काही दिवसांपूर्वी मौलाना सय्यद आलमगीर अशरफ यांनी मनपाच्या सहकार्याने मुस्लीम समाजातील काही प्रतिष्ठित, नेतृत्व करणाऱ्या नागरिकांची सभा घेऊन लसीकरणाचे फायदे समजावून सांगितले होते.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., लसीकरण मोहिमेचे मार्गदर्शक अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्या नेतृत्वात मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त विजय हुमणे यांच्या नियोजनात झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. अतिक उर रहेमान खान, आशीनगर झोनचे झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपांकर भिवगडे यांच्या उपस्थितीत वैद्यकीय पथकातील डॉ. हिना कुरेशी यांनी लसीकरण केले. हाजी अयूब अन्सारी, जलील अन्सारी, मौलाना जफर, ऐहसान कादरी, हाफीज अख्तर आलम अशरफी, वजहुल अशरफी, अश्विन बोदोले यांनी सहकार्य केले.