३१,४९९ नागरिकांचे लसीकरण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:12 IST2021-04-30T04:12:02+5:302021-04-30T04:12:02+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : राज्य शासनाच्या आदेशान्वये आराेग्य विभागाने ४५ वर्षांवरील नागरिकांच्या काेराेना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात केली. त्याअनुषंगाने ...

३१,४९९ नागरिकांचे लसीकरण पूर्ण
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : राज्य शासनाच्या आदेशान्वये आराेग्य विभागाने ४५ वर्षांवरील नागरिकांच्या काेराेना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात केली. त्याअनुषंगाने या वयाेगटातील कळमेश्वर तालुक्यातील ३६,७०९ नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले हाेते. यातील ३१,४९९ नागरिकांचे लसीकरण गुरुवार (दि. २९)पर्यंत पूर्ण करण्यात आले. यात काहींना पहिला तर व दुसरा डाेस देण्यात आला आहे.
तालुक्यात बुधवार (दि. २८)पर्यंत ३१,१८४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यात पहिला डाेस घेणाऱ्या २८,९३४ तर दुसरा डाेस घेणाऱ्या २,२५० नागरिकांचा समावेश असून, गुरुवारी (दि. २९) ३१५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. १८ ते ४४ वर्षे वयाेगटातील ७० ते ७५ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. ४५ वर्षांवरील ३० ते ३५ हजार नागरिकांना दुसरा डाेस देण्यात आला. या सर्वांनी काेराेना प्रतिबंधक नियम व उपाययाेजनांचे पालन करणे आवश्यक आहे, अशी माहिती डाॅक्टरांनी दिली असून, त्याअनुषंगानेही जनजागृती केली जात आहे.
कळमेश्वर-ब्राह्मणी शहरात ४५ वर्षांवरील ९,५३७ नागरिकांचे लसीकरण करावयाचे हाेते. यातील ८,१५३ नागरिकांना या लसीचा पहिला तर १,३८४ नागरिकांना दुसरा डाेस देण्यात आला, अशी माहिती आराेग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. कळमेश्वर शहरातील ग्रामीण रुग्णालय व श्री संत सावता महाराज मंदिर तसेच तालुक्यातील गोंडखैरी, धापेवाडा, मोहपा व तेलगाव प्राथमिक आराेग्य केंद्र आणि त्याअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांमध्ये काेराेना प्रतिबंधक लसीकरणाची साेय करण्यात आली आहे.
...
जनजागृतीवर विशेष भर
काेराेना प्रतिबंधक लसीबाबत जनमानसात माेठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण झाले हाेते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात लसीकरणाचा वेगही संथ हाेता. लसीकरणाला वेग यावा म्हणून प्रशासनाच्या वतीने जनजागृती अभियान सुरू करून नागरिकांच्या मनातील भीती व संभ्रम दूर केला जात आहे. या अभियानात आराेग्य, महसूल, पाेलीस व पंचायत विभागातील कर्मचाऱ्यांसह नगर परिषद व ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले आहेत. ज्यांनी या लसीचा पहिला डाेस घेतला, त्यांना विशिष्ट कालावधीत दुसरा डाेस घेणे अनिवार्य आहे. शिवाय, दाेन्ही डाेस घेतल्यानंतर मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे यासह अन्य नियम व उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करणेही अत्यावश्यक आहे, अशी माहिती डाॅक्टरांनी दिली.
...
१८ ते ४४ वर्षे वयाेगटातील नागरिकांचे लसीकरण करणे ही माेठी जबाबदारी आहे. लस घेतेवेळी ४५ वर्षांवरील नागरिकांनी प्रशासनाला सहयाेग केला. तसेच सहकार्य १८ ते ४४ वर्षे वयाेगटातील नागरिकांनी करायला पाहिजे. या लसीबाबत नागरिकांनी सकारात्मक विचार करावा.
- सचिन यादव,
तहसीलदार, कळमेश्वर.