नागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागासोबतच आता वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त पदांपैकी ५० टक्के पदभरतीस मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य, कुटुंबकल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी ‘लोकमत’ला दिली. शनिवारी मेयो, मेडिकलचा आढावा घेण्यासाठी ते नागपुरात आले असताना बोलत होते.
यड्रावकर यांनी सकाळी १०.३० वाजता मेडिकलच्या अधिष्ठाता कक्षात सर्व वरिष्ठ डॉक्टरांशी चर्चा केली. मेडिलकचा आढावा घेत उपाययोजनांबाबत काही सूचनाही केल्या. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, प्रभारी अधिष्ठाता डॉ. आर. पी. सिंग, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मेडिकलमधील फायर ऑडिट आणि संबंधित रुग्णालयातील सुरक्षात्मक उपाययोजना, ऑक्सिजन पुरवठ्याबाबत माहिती घेतली. आईकडून नवजात बाळांना झालेला कोविडचा संसर्ग, कोविड रुग्णांसाठीच्या व्यवस्थेची यावेळी त्यांनी माहिती घेतली.
- फायर व विद्युत ऑडिटसाठी निधी देणार
भंडारा अग्निकांड भविष्यात इतर रुग्णालयात होऊ नये यासाठी सर्व शासकीय रुग्णालयांचे फायर व विद्युत ऑडिट करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी लागणारा निधी दिला जाईल. तशी तरतूदही करण्यात आल्याचे यड्रावकर म्हणाले.
- मेडिकलचा कॅन्सर हॉस्पिटल प्रश्न निकाली काढू
मेडिकलमध्ये कॅन्सर हॉस्पिटलच्या उभारणीसाठी २०१२ पासून प्रयत्न सुरू आहेत. एका जनहित याचिकेवर, जून २०१७ मध्ये दोन वर्षांत कॅन्सर हॉस्पिटल उभारावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. इमारतीच्या बांधकामासाठी ७६ कोटी १० लाख ५८ हजार रुपयांना प्रशासकीय मंजुरीही देण्यात आली आहे. परंतु कोणत्या ना कोणत्या कारणामुळे प्रकल्प रखडत चालला आहे. याबाबत बोलताना यड्रावकर म्हणाले, कॅन्सर हॉस्पिटलचा प्रश्न लवकरच निकाली निघणार आहे. याचा फायदा गरीब रुग्णांना होईल.
- सिकलसेल नमुन्याच्या तपासणीसाठी नागपुरात प्रयोगशाळा
सिकलसेलचे नमुने तपासणीसाठी मुंबई आणि हैदराबाद येथील प्रयोगशाळांमध्ये पाठविण्यात येत होते. त्यामुळे अहवाल येण्याची प्रतीक्षा करावी लागत असे. सिकलसेलच्या रुग्णांसाठी आता नागपुरातच नमुना तपासणी प्रयोगशाळा सुरू होणार आहे, असेही यड्रावकर यांनी सांगितले.