उस्ताद अमीर खाँच्या आठवणीत रंगलेले रागसंगीत
By Admin | Updated: February 19, 2015 02:08 IST2015-02-19T02:08:28+5:302015-02-19T02:08:28+5:30
शास्त्रीय संगीतात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि आगळ्यावेगळ्या आलापीप्रधान गायकीने श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणारे मरहूम अमीर खाँ साहेब यांच्या ...

उस्ताद अमीर खाँच्या आठवणीत रंगलेले रागसंगीत
नागपूर : शास्त्रीय संगीतात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि आगळ्यावेगळ्या आलापीप्रधान गायकीने श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणारे मरहूम अमीर खाँ साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित संगीत सभेत ज्येष्ठ गायक आणि उस्ताद अमीर खाँ साहेबांचे मार्गदर्शन लाभलेले डॉ. बाळासाहेब पुरोहित व प्रभाकरराव काळे तसेच डॉ. पुरोहित यांचे शिष्य विनोद वखरे यांनी रागसंगीताच्या मैफिलीतून खाँ साहेबांना भावपूर्ण स्वरांजली अर्पण केली.
हा कार्यक्रम वसंतनगर येथे आयोजित करण्यात आला. संगीत सभेचा प्रारंभ ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण जोशी तसेच भय्यासाहेब हारोडे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी विनोद वखरे यांनी राग यमनमध्ये विलंबित एकतालात ‘कहो सखी कैसे’ आणि द्रुत त्रितालात निबद्ध बंदिश तसेच तराणा सादर केला. पत्रकारितेच्या क्षेत्रात मोलाचा जीवनगौरव सन्मान प्राप्त झाल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार जोशी यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर प्रभाकर काळे यांनी राग सरस्वतीने उपस्थितांना जिंकले. विलंबित एकतालात आणि द्रुत त्रितालात त्यांनी सादरीकरण केले. भजन सादर करून त्यांनी गायनाचा समारोप केला. मोजके आणि रसाळ गायन ही त्यांची जमेची बाजू होती. त्यांना संवादिनीवर श्याम ओझा तर तबल्यावर राम ढोक व नीलेश खोडे यांनी साथ दिली.
मैफिलीचा समारोप बाळासाहेब पुरोहित यांनी दरबारी, शहाणा कानडा, जोग व मालकंस या रागातील विविध बंदिशींनी केला. मध्यसप्तकातील षड्जाला साद घालणारे पुरोहित यांचे गायन म्हणजे युवा गायकांसाठी पर्वणीच होती. खाँ साहेबांच्या स्मृतींची आठवण करणारे तसेच वेगवेगळ्या त्रिताल, झपताल, रूपक, एकतालात निबद्ध बंदिशी त्यांनी रसाळतेने सादर केल्या. ‘न्पगवा गुरु के लगना’ या मालकंसमधील बंदिशीने त्यांनी खाँ साहेबांना श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमाचे निवेदन साधना शिलेदार यांनी केले. याप्रसंगी सुभाष कशाळकर, भय्यासाहेब हारोडे, सुजाता व्यास, शंकर भट्टाचार्य, पत्तरकिने, मीना राव यांच्यासह अनेक ज्येष्ठ कलावंत उपस्थित होते. ध्वनिसंयोजन मल्हार क्रिएशन्स यांचे होते. (प्रतिनिधी)