पाणीपुरवठा योजनांसाठी सौर स्टार्टरचा वापर
By Admin | Updated: July 14, 2015 03:20 IST2015-07-14T03:20:43+5:302015-07-14T03:20:43+5:30
ग्रामीण भागातील लोक ांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी सौरऊर्जा स्टार्टरचा वापर केला जाणार आहे. मौदा

पाणीपुरवठा योजनांसाठी सौर स्टार्टरचा वापर
नागपूर : ग्रामीण भागातील लोक ांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी सौरऊर्जा स्टार्टरचा वापर केला जाणार आहे. मौदा तालुक्यातील चिरवा गावात याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरू केला आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा योजनासाठी याचा वापर करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या विचाराधीन आहे.
या स्टार्टरच्या माध्यमातून जलकुंभातील पाण्याची पातळी, पुरवठा करण्यात आलेले पाणी याची माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच जलकुंभात पाणी नसल्यास घरुनच मोटारपंप सुरू करता येईल. यामुळे गावापासून दूर व जंगल भागातील जलस्रोत असलेल्या योजनासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल, असा विश्वास अध्यक्ष निशा सावरकर यांनी व्यक्त केला.ग्रामीण भागातील वीज भारनियमनाचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. परंतु सौरऊर्जेवरील स्टार्टरमुळे वीज प्रवाह सुरू होताच मोटारपंप सुरू करता येईल. यासाठी आर्थिक तरतूद करून जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.
दरम्यान पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे उद्भवणाऱ्या साथ रोगाला आळा घालण्यासाठी मेडीक्लोर औषधाचा घरोघरी पुरवठा करण्यात यावा. ग्रामीण भागात जनजागृती करण्याच्या सूचना आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. पारशिवनी येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मागील काही वर्षापासून प्रलंबित आहे. लोकांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्याचे निर्देश समितीच्या बैठकीत देण्यात आले.
जलयुक्त शिवर योजना प्रभावीपणे राबविली जावी, यात लोकसहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना जि.प.च्या सिंचन विभागाला करण्यात आल्याची माहिती सावरकर यांनी दिली. (प्रतिनिधी)