सिंगल यूज प्लास्टिकचा वापर पुन्हा वाढला ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:07 IST2021-04-09T04:07:58+5:302021-04-09T04:07:58+5:30
नागपूर : प्लास्टिकवर लावलेले निर्बंध आता कुचकामी ठरल्याचे दिसत आहे. प्रशासनाकडून दुर्लक्ष हाेत असल्याने १० मायक्राॅनपेक्षा कमी वजनाच्या सिंगल ...

सिंगल यूज प्लास्टिकचा वापर पुन्हा वाढला ()
नागपूर : प्लास्टिकवर लावलेले निर्बंध आता कुचकामी ठरल्याचे दिसत आहे. प्रशासनाकडून दुर्लक्ष हाेत असल्याने १० मायक्राॅनपेक्षा कमी वजनाच्या सिंगल यूज प्लास्टिकचा वापर सर्रासपणे केला जात आहे. बाजारातील किरकाेळ विक्रेते बिनदिक्कतपणे ग्राहकांना प्लास्टिक पिशव्यांमध्ये सामान देत असून, वेळेत मिळणाऱ्या सुविधेसाठी ग्राहकही पर्यावरणाला हाेणाऱ्या धाेक्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
लाेकांच्या घरातून दरराेज प्लास्टिकचा कचरा बाहेर पडत आहे. याचा अर्थ ताे बाहेर मिळत आहे. आजघडीला कुठलाही भाजी विक्रेता, फळविक्रेता किंवा किराणा दुकानात सहजपणे प्लास्टिकच्या पिशव्या सामानासाठी दिल्या जात आहेत. आधी नाही म्हटले जाते, पण नंतर ग्राहकांकडून आग्रह केल्यानंतर तुम्हाला त्या पिशव्यात साहित्य दिले जाते. एवढेच नाही तर सिंगल यूज प्लास्टिकपासून बनलेले पात्र व इतर साहित्याचीही विक्री जाेरात सुरू आहे. काही वर्षांपूर्वी कडक निर्बंध लावण्यात आले. मनपा व जिल्हा प्रशासनाद्वारे प्लास्टिकमुक्त अभियान चालविण्यात आले. धडक कारवाई सुरू झाली. त्यामुळे प्लास्टिक वापरावर काही प्रमाणात अंकुश आले हाेते. मात्र आता पुन्हा परिस्थिती बदलली आहे. गेल्या वर्षीपासून काेराेना काळात कारवाई शिथिल झाल्याने पुन्हा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. किरकाेळ माल विक्रेते, फळ विक्रेत्यांकडून तर खुलेआम वापर केला जात आहे. यामुळे पुन्हा पर्यावरणावर विपरीत परिणाम हाेत आहे. विशेषत: जनावरांवर आणि जंगलातील झाडांवर याचे प्रदूषणाचे परिणाम हाेत आहेत.
काेराेनामुळे कारवाई शिथिल
सध्या नागपुरातही काेराेनाने थैमान घातले आहे. दरराेज निघणारा रुग्णांचा आकडा थरकाप उडविणारा आहे. त्यामुळे महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा महामारीवर नियंत्रण मिळविण्याच्या कामी लागली आहे. त्यामुळे साहजिकच इतर गाेष्टींकडे दुर्लक्ष हाेत आहे. काेराेना निपटू द्या, मग बघू काय करायचे, अशी भावना मनपाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त हाेत आहे.
दुकानदारांकडून खुलेआम वाटप
किरकाेळ साहित्य विक्रेते, भाजी विक्रेते, फळे विक्रेते, दूध, खाद्यसामग्री, घरगुती साहित्य प्लास्टिक पिशव्यांमधून दिल्या जात आहेत. प्रशासनाकडून कारवाईकडे दुर्लक्ष झाल्याने यांचे चांगलेच फावले आहे. उपयाेगानंतर फेकल्याने तेच प्लास्टिक डाेकेदुखी ठरत आहे. जनावरांच्या पाेटात जात आहे. नदी, नाल्यांचा प्रवाह राेखत आहे.
नागरिकही तेवढेच जबाबदार
प्रशासनाची कारवाई थांबली असल्याने दुकानदार वापर करीत आहेत. पण यात नागरिकही तेवढेच जबाबदार आहेत. प्रतिबंध लावल्याशिवाय एखादी वस्तू नाकारण्याचा प्रामाणिकपणा आपल्याला सुचत नाही. लाेक मागतात म्हणून दुकानदार देतात आणि दुकानदार देतात म्हणून बिनदिक्कतपणे आपण ती घेताे. प्लास्टिक पर्यावरणासाठी हानीकारक आहे, हे सर्वांना माहीत आहे. पण त्यानुसार कुणी वागत नाही. पर्याय उपलब्ध असताना बेजबाबदारपणा का करण्यात येताे, असा सवाल तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.