निकृष्ट सिमेंटचा वापर?
By Admin | Updated: July 6, 2014 00:49 IST2014-07-06T00:49:40+5:302014-07-06T00:49:40+5:30
जलवाहिनीच्या कामात कंत्राटदाराकडून निकृष्ट सिमेंटचा वापर केला जात असल्याचे पाहून नागरिक संतप्त झाले. त्यांनी प्जलवाहिनीचे काम बंद पाडून सिमेंटच्या पोत्यांनी भरलेले वाहन पोलिसांच्या हवाली केले.

निकृष्ट सिमेंटचा वापर?
नागरिक संतप्त : जलवाहिनीचे काम रोखले
नागपूर : जलवाहिनीच्या कामात कंत्राटदाराकडून निकृष्ट सिमेंटचा वापर केला जात असल्याचे पाहून नागरिक संतप्त झाले. त्यांनी प्जलवाहिनीचे काम बंद पाडून सिमेंटच्या पोत्यांनी भरलेले वाहन पोलिसांच्या हवाली केले.
गणेशपेठेतील गुजरवाडी परिसरात नळाच्या पाईपलाईनचे काम सुरू आहे. या कामामुळे रस्त्याच्या कडेला झालेले खड्डे बुजविण्यासाठी कंत्राटदाराने थातूरमातूर पद्धत अवलंबल्याचा आरोप आहे. सिमेंटचे फ्लोरिंग करण्यासाठी आज सायंकाळी ५.३० च्या सुमारास सिमेंटची पोती भरलेले वाहन (एमएच ४९/ डी १८१७) घटनास्थळी आले. कंत्राटदाराकडून काम निकृष्टपणे केले जात असल्यामुळे नागरिकांचे त्यावर लक्ष होते. श्री नवदुर्गा उत्सव युवा मंडळाचे कार्यकर्ते घटनास्थळी होते. सिमेंटची पोती खाली उतरवल्यानंतर कामगारांनी मसाला बनविण्यासाठी ती उघडली. श्री नवदुर्गा उत्सव युवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता हे सिमेंट मातीसारखे दिसले. त्यामुळे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक संतप्त झाले. सिमेंट गडचिरोलीतील अंबर शक्ती कंपनीचे असले तरी पोत्यांवर आयएसआय मार्क नसल्यामुळे संतापात भर पडली. नागरिकांनी कंत्राटदाराला धारेवर धरून घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे तणाव वाढला. माहिती कळताच गणेशपेठ पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी सिमेंट भरलेले वाहन ताब्यात घेऊन ठाण्यात नेले. हे सिमेंट नव्हे माती आहे, असा आरोप करून कंत्राटदारावर कारवाई करण्याची संतप्त नागरिकांची मागणी होती.
गणेशपेठचे ठाणेदार सुधीर नंदनवार यांनी प्रसंगावधान राखत नागरिकांना शांत केले. सिमेंट तपासणीसाठी संबंधित तज्ज्ञांकडे पाठवू आणि ते निकृष्ट असल्याचा अहवाल मिळाल्यास कडक कारवाई करू, असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले. त्यानंतर तणाव निवळला. (प्रतिनिधी)