निवडणुकीत पेपर ट्रेल व बायो-मेट्रिक पद्धत वापरा
By Admin | Updated: March 15, 2017 02:31 IST2017-03-15T02:31:47+5:302017-03-15T02:31:47+5:30
यापुढे होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये ‘ईव्हीएम’सोबत पेपर ट्रेल व बायो-मेट्रिक पद्धतीचाही उपयोग करण्यात यावा,

निवडणुकीत पेपर ट्रेल व बायो-मेट्रिक पद्धत वापरा
हायकोर्टात याचिका : अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची विनंती
नागपूर : यापुढे होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये ‘ईव्हीएम’सोबत पेपर ट्रेल व बायो-मेट्रिक पद्धतीचाही उपयोग करण्यात यावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची विनंतीही याचिकेत करण्यात आली आहे.
अरुण दांधी व सुजाता धाकरे अशी याचिकाकर्त्यांची नावे असून, ते अकोला येथील रहिवासी आहेत. दांधी यांनी प्रभाग-१३(डी)मधून अपक्ष उमेदवार म्हणून तर, धाकरे यांनी प्रभाग-१३(ए)मधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांनी मंगळवारी याचिकेवर सुनावणी केल्यानंतर राज्य गृह विभाग, राज्य निवडणूक आयोग व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
निवडणुका पारदर्शी होण्यासाठी व निकाल जाहीर करण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी मतदानाकरिता ईव्हीएम यंत्राचा उपयोग केला जात आहे. परंतु ‘ईव्हीएम’संदर्भात अनेक तक्रारी आहेत. ईव्हीएम योग्य पद्धतीने कार्य करीत नाही.
ईव्हीएम हॅक झाल्याच्या व त्यात जाणिवपूर्वक बिघाड करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. ही बाब लोकशाहीकरिता मारक आहे. निवडणुका पारदर्शी पद्धतीने झाल्यासच लोकशाही टिकेल.
यावर्षी ‘ईव्हीएम’विरु द्ध सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ‘ईव्हीएम’मध्ये पेपर ट्रेल पद्धतीचा उपयोग करण्याचा आदेश दिला होता. ही पद्धत वापरल्यास मतदारांना त्यांनी दिलेले मत योग्य उमेदवाराच्या खात्यात जमा झाल्याचे कळू शकेल. तसेच आता याही पुढे जाऊन ‘ईव्हीएम’सोबत बायो-मेट्रिक यंत्राचा उपयोग करणे आवश्यक आहे. ‘ईव्हीएम’सह या दोन्ही पद्धतींचा अवलंब केल्यास निवडणूका अधिक पारदर्शी होतील. याशिवाय निवडणुकीची कामे करताना होणाऱ्या गंभीर चुका टाळण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले गेले पाहिजे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. रजनीश व्यास यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)