Use of cooking gas for auto: Raid on the factory | स्वयंपाकाच्या गॅसचा वापर ऑटोसाठी : कारखान्यावर छापा
स्वयंपाकाच्या गॅसचा वापर ऑटोसाठी : कारखान्यावर छापा

ठळक मुद्देयशोधरानगर पोलिसांची कारवाई : दोघांना अटक, ३२ सिलिंडर जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वयंपाकाच्या वापरात येणारे गॅस सिलिंडरमधील गॅस ऑटोत भरणाऱ्या दोघांना यशोधरानगर पोलिसांनी अटक केली. वसिम खान याकूब खान (वय ३१) आणि शेख अशपाक शेख मुख्तार (वय ३६) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेही राजीव गांधी नगर झोपडपट्टीत राहतात. त्यांच्याकडून पोलिसांनी एचपीचे ३२ सिलिंडर, ऑटो आणि मशीनसह २ लाख, ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
शहरात अनेक वाहने गॅस सिलिंडरवर धावतात. मात्र, त्यासाठी वाहनात विशिष्ट किट आणि व्यावसायिक गॅसचाच वापर करणे बंधनकारक आहे. तथापि, आरोपी वसिम आणि अशपाकने घरगुती वापराच्या सिलिंडरमधील गॅस ऑटोत भरण्याचे तंत्र विकसित केले. हे इंधन अत्यंत स्वस्त पडत असल्याने आरोपींच्या राजीव गांधीनगरातील कारखान्यात ऑटोचालकांची नेहमी वर्दळ राहायची. यशोधरानगरचे ठाणेदार पी. जे. रायन्नावार यांना ही माहिती कळाली. त्यांनी पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी आरोपींच्या कारखान्यावर छापा मारून दोघांनाही जेरबंद केले. त्यांच्याकडून एचपीचे ३२ सिलिंडर, ऑटो आणि मशीनसह २ लाख, ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एपीआय दिनेश लबडे, प्रशांत अन्नछत्रे, पीएसआय एस. ए. दराडे, भार्गव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सहभाग घेतला.
दिल्लीमेड फॉर्म्युला
आरोपी वसिम आणि अशपाकला यापूर्वीही या गोरखधंद्यात अटक झाली आहे. मात्र, मोठा नफा असल्याने त्यांनी धंदा बंद करण्याऐवजी तो वाढवला. त्यांनी दिल्लीतून गॅस ट्रान्सफर करणारी काही उपकरणे आणली. त्या उपकरणाने सिलिंडरमधील गॅस ते ऑटोत भरत होते. हिंगण्यात वर्षभरापूर्वी असाच एक कारखाना पकडण्यात आला होता तर, अनेक ठिकाणी अशा कारखान्यात स्फोट झाल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. आरोपींनी दाटीवाटीच्या वस्तीत हा कारखाना उघडून मोठा धोका निर्माण केला होता.

 


Web Title: Use of cooking gas for auto: Raid on the factory
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.