भदंत सुरेई ससाई यांना अमेरिकेचा पुरस्कार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:07 IST2021-06-02T04:07:07+5:302021-06-02T04:07:07+5:30
-जगभरातून अडीचशेच्यावर सहभागी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांना डॉ. ...

भदंत सुरेई ससाई यांना अमेरिकेचा पुरस्कार ()
-जगभरातून अडीचशेच्यावर सहभागी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांना डॉ. आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका या संस्थेतर्फे डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल अचिव्हमेंट अवाॅर्डने सन्मानित करण्यात आले. आभासी पद्धतीने पार पडलेल्या या समारंभात जगभरातून २६० मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. आंबेडकर मिशनचे डॉ. एस. के. गजभिये यांच्या निवासस्थानी नवा नकाशा येथे पार पडले.
८६ वर्षीय आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्मगुरू सुरेई ससाई यांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची चळवळ उभी केली. टप्प्याटप्प्यात हे आंदोलन ते आंतरराष्ट्रीयस्तरावर घेऊन गेले. या आंदोलनामुळेच युनेस्कोला या मागणीची दखल घ्यावी लागली व महाबोधी महाविहार वारसा म्हणून घोषित करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ पुढे नेण्यात ससाई यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन डॉ. आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका या संस्थेचे अध्यक्ष (मूळ भारतीय) आयटी अभियंता पंकज मेश्राम यांच्या हस्ते ससाई यांना पुरस्कार देण्यात आला.
याशिवाय साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्यांनाही सन्मानित करण्यात आले. बाबासाहेबांची चळवळ पुढे नेण्यात ज्यांनी आयुष्य खर्ची घातले, अशा लोकांची दखल या संस्थेतर्फे घेतली जाते. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पुरस्कार दिला जातो. मागच्या वर्षी संस्थेतर्फे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना सन्मानित केले होते. मूळ भारतीय असलेल्यांनी अमेरिकेत या संस्थेची स्थापना केली. भारतातून अमेरिकेत गेलेल्या युवकांना शिक्षण, रोजगार आणि सामाजिक कार्यासाठी संस्था मदत आणि मार्गदर्शन करते.