अट्टल चोरट्यास अटक
By Admin | Updated: February 2, 2017 02:29 IST2017-02-02T02:29:16+5:302017-02-02T02:29:16+5:30
जिल्ह्यातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश आले.

अट्टल चोरट्यास अटक
दुचाकी हस्तगत : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
नागपूर : जिल्ह्यातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश आले. दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली. सदर आरोपीकडून पोलिसांनी चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे.
महेश गजानन लोणारे (रा. जामगाव, ता. नरखेड) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी हा २५ दिवसांपूर्वी कारागृहातून सुटल्यानंतर दोन दिवसातच त्याच्याकडे एक दुचाकी दिसल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. सदर माहितीच्या आधारे व पूर्वीच्या चोरीच्या गुन्ह्यावरून त्यास जामगाव येथून ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसांनी त्यास विश्वासात घेत विचारपूस सुरू केली असता त्याने ५ जानेवारी २०१७ रोजी धंतोली, काटोल भागातून एक दुचाकी चोरी केल्याची व ती विकण्यासाठी एका झुडपी जंगलात लपवून ठेवल्याची पोलिसांना कबुली दिली. त्याने लपवून ठेवलेली एमएच-४०/एसआर-२६६ क्रमांकाची दुचाकी पोलिसांनी झुडपी जंगलातून हस्तगत केली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध काटोल पोलिसांत भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. विशेष म्हणजे, सदर आरोपी हा गेल्या वर्षभरापासून जलालखेडा पोलीस ठाण्यांतर्गत एका चोरीच्या गुन्ह्यात फरार होता. गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त दुचाकी व आरोपीला काटोल पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आरोपीकडून आणखी दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.(जिल्हा प्रतिनिधी)