अर्थसंकल्पात अवास्तव उत्पन्न दर्शविले
By Admin | Updated: June 29, 2015 03:10 IST2015-06-29T03:10:53+5:302015-06-29T03:10:53+5:30
महापालिकेच्या सन २०१५-१६ च्या प्रस्तावित अंदाजपत्रकात अवास्तव उत्पन्न दशंविण्यात आले आहे.

अर्थसंकल्पात अवास्तव उत्पन्न दर्शविले
युनियनचा आरोप : अर्थसंकल्प नामंजूर करण्याची मागणी
नागपूर : महापालिकेच्या सन २०१५-१६ च्या प्रस्तावित अंदाजपत्रकात अवास्तव उत्पन्न दशंविण्यात आले आहे. हा अर्थसंकल्प कामगारविरोधी व खासगीकरणाकडे नेणारा असल्याने सभागृहाने याला मंजूर करू नये, अशी मागणी नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन एम्प्लॉईज युनियनने केली आहे.
१ आॅगस्ट २०१५ पासून एलबीटी रद्द होणार आहे. परंतु प्रस्तावित अर्थसंकल्पात एलबीटीपासून ४५० कोटींचे उत्पन्न गृहित धरण्यात आले आहे. त्यामुळे अर्थसंकल्प १९४२ की १६४२ कोटींचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ३० जुलैपर्यंत एलबीटीपासून १४० कोटींचे उत्पन्न होण्याची शक्यता आहे. त्यातच एलबीटी न भरणाऱ्यांना सरकारने व्याज व दंड माफ केला आहे. जेएनएनयूआरएमअंतर्गत प्रस्तावित व सुरू असलेल्या प्रकल्पात मनपाला ३० टक्के निधी द्यावा लागणार आहे. या प्रकल्पांना विलंब झाल्यास खर्चात वाढ होणार आहे. हा बोजा मनपावर पडणार आहे. अशा १२ प्रकल्पांवर मनपाने ४२२.११ कोटी रु. खर्च केले आहे. अर्थसंकल्पात ही बाब दर्शविण्यात आलेली नाही. प्रकल्पाच्या वाढीव खर्चाला सभागृहाची मंजुरी घेण्यात आलेली नाही. अर्थसंकल्पात आस्थापना, प्रशासकीय व दुरुस्तीचा खर्च एकत्रित दर्शविण्यात आला आहे. आस्थापना खर्च हा स्वतंत्र दर्शविण्यात यावा. रोजंदारी कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करणे, कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यासाठी कोणत्याही स्वरूपाची तरतूद करण्यात आलेली नाही. वास्तवावर आधारित नसल्याने तो मंजूर करू नये, अशी मागणी युनियनचे अध्यक्ष जम्मू आनंद यांनी केली आहे.(प्रतिनिधी)