थरारक घटनेनंतरही फुटाळा असुरक्षित
By Admin | Updated: October 5, 2015 03:10 IST2015-10-05T03:10:27+5:302015-10-05T03:10:27+5:30
निकीता फुलवानी या युवतीच्या जळीत प्रकरणानंतर ‘लोकमत’ने रविवारी फुटाळा तलावावर रात्री ८ ते ९.३० या काळातील चित्र अनुभवले.

थरारक घटनेनंतरही फुटाळा असुरक्षित
पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष : शनिवारच्या घटनेचा विसर
नागपूर : निकीता फुलवानी या युवतीच्या जळीत प्रकरणानंतर ‘लोकमत’ने रविवारी फुटाळा तलावावर रात्री ८ ते ९.३० या काळातील चित्र अनुभवले. यावेळी फुटाळा तलावावर नेहमीप्रमाणे युवक-युवती आणि नागरिकांची प्रचंड गर्दी अनुभवायला मिळाली. शनिवारची थरारक घटना घडल्यानंतरही परिसरात पोलिसांची गस्त असणे अपेक्षित असताना पोलिसांची गस्त नव्हती. याशिवाय प्रेमी युगुलांचे किळसवाणे प्रकारही खुलेआम सुरु असल्याचे दृष्टीस पडले. निकीतासारखी घटना घडु नये, यासाठी दक्षता म्हणून कुठलीच खबरदारी घेताना कुणीच आढळले नाही. अशा घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिस आणि सुज्ञ नागरिकांचा दबावही परिसरात आढळून आला नाही.
शनिवारी रात्री निकीता फुलवानी ही युवती गंभीररित्या जळाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. या प्रकारामुळे रविवारी फुटाळा तलावावर नेहमीसारखी गर्दी होणार नाही, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता. ‘लोकमत’ने रविवारी रात्री ८ ते ९.३० या वेळात फुटाळा तलावावरील परिस्थिती अनुभवली. नेहमीप्रमाणे फुटाळा तलावावर नागरिकांची गर्दी झाली होती. काहीही घडलेच नाही, अशा अर्विभावात युवक - युवती नेहमीप्रमाणे फुटाळा परिसरात अश्लील चाळे करीत होते. या परिसरात मोठ्या प्रमाणात असामाजिक तत्वांचा वावर असून येथे आपल्या मित्रांसह येणाऱ्या युवतींना त्यांचा मनस्ताप सहन करावा लागतो. मोठ्या प्रमाणात छेडखानीच्या घटनाही घडतात पण प्रत्येकवेळी पोलिसांत तक्रार करण्याचे टाळले जाते. त्यामुळेच केवळ तक्रार आल्यावर कारवाई न करता पोलिस प्रशासनानेही अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. पण एवढी गंभीर घटना घडूनही तलावावर एकही पोलीस गस्त घालताना किंवा तेथील अवैध प्रकारावर अंकुश लावताना दिसला नाही. रात्री उशीरापर्यंत तलावावर गर्दीचे चित्र दिसले. (प्रतिनिधी)
किळसवाणे प्रकार सुरुच
फुटाळा तलावावर प्रेमी युगुलांची दररोज गर्दी होते. अंधार पडला की या प्रेमी युगुलांचे किळसवाणे प्रकार सुरु होतात. फुटाळा तलावावर अनेक नागरिक कुटुंबासह येतात. लहान मुलांना हे किळसवाणे प्रकार पाहावे लागतात. अखेर सध्या तर कु टुंबासह फुटाळ्याला जाणे जवळजवळ बंदच झाले आहे. यामुळेच युवक - युवतींना फावते. यात प्रामुख्याने परप्रांतातील युवती येथे मोठ्या प्रमाणात येतात. निकीताच्या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस तेथे गस्त घालून हे प्रकार बंद करतील, अशी अपेक्षा होती. परंतु एकही पोलीस तेथे ड्युटीवर असल्याचे आढळले नाही.
पोलीस चौकी बंद
फुटाळा परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस चौकीची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु गंभीर घटना घडल्यावर २४ तासही उलटत नाहीत तोपर्यंत पोलिसांची गस्त नव्हतीच पण रविवारी फुटाळा परिसरातील पोलीस चौकी बंद असल्याचे दृष्टीस पडले. त्यामुळे अचानक एखादी अप्रिय घटना घडल्यास परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसच उपस्थित राहत नसल्यामुळे अडचण निर्माण होईल, यात शंका नाही.
चिडीमारांचे टोळके सक्रिय
फुटाळा तलावावर येणाऱ्या प्रेमी युगुलांनी एकांतवास पाहून तलावाच्या काठावर बसल्यानंतर अनेकजण चिडीमारी करताना आढळले. या चिडीमारांपासून बचाव करण्यासाठी अनेक प्रेमी युगुल तेथून निघून गेल्याचे दिसले. कुठलीच कारवाई होत नसल्यामुळे या चिडीमारांच्या टोळक्यांचे चांगलेच फावत असून त्यांच्यावर अंकुश लावण्याची गरज निर्माण झाली आहे.