विद्यापीठाचे संकेतस्थळ ‘डेड’
By Admin | Updated: July 23, 2014 01:00 IST2014-07-23T01:00:15+5:302014-07-23T01:00:15+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि ‘एमकेसीएल’ यांच्यातील वादाचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. विद्यापीठाचे ‘डिजिटल’ संकेतस्थळ उघडण्याचा प्रयत्न केला असता सातत्याने

विद्यापीठाचे संकेतस्थळ ‘डेड’
प्रशासन झोपेत : ‘एमकेसीएल’च्या जाण्याचा फटका
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि ‘एमकेसीएल’ यांच्यातील वादाचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. विद्यापीठाचे ‘डिजिटल’ संकेतस्थळ उघडण्याचा प्रयत्न केला असता सातत्याने ‘आऊट आॅफ सर्व्हिस’चा संदेश लिहून येत आहे. ‘एमकेसीएल’ने काढता पाय घेतला असला तरी विद्यापीठाने तत्काळ पर्यायी व्यवस्थेची हालचाल न केल्याने संकेतस्थळ ‘डेड’ झाले आहे.
विद्यापीठाची दोन संकेतस्थळे अस्तित्वात आहेत. यातील ‘आरटीएमएनयू. डिजिटलयुनिव्हर्सिटी’ या संकेतस्थळाचे सर्व काम ‘एमकेसीएल’कडे होते. सुरुवातीला सर्वकाही योग्य राहिल्यानंतर विद्यापीठ व ‘एमकेसीएल’मध्ये खटके उडायला लागले. ‘एमकेसीएल’ने कामांची पूर्तता केली नसल्याचा आरोप विद्यापीठाकडून करण्यात आला अन् सुमारे ३ कोटी ६४ लाखांची देयके थकवून ठेवली.
‘एमकेसीएल’ने वाढीव बिले दिल्याचादेखील दावा विद्यापीठ प्रशासनाने केला होता. ‘एमकेसीएल’ने थकबाकीसाठी जवळपास २५० वेळा विद्यापीठाला पत्र लिहिले. अखेर ‘एमकेसीएल’ने विद्यापीठाचे काम थांबविण्याचा निर्णय घेतला.
याचा फटका सर्वात पहिले बसला तो विद्यापीठाच्या ‘आरटीएमएनयू.डिजिटलयुनिव्हर्सिटी’ या संकेतस्थळाला. हे संकेतस्थळ तात्पुरते ‘आऊट आॅफ सर्व्हिस’ असल्याचा संदेश येत आहे. विद्यार्थी व महाविद्यालयांनी अधिक माहितीसाठी विद्यापीठाशी थेट संपर्क साधावा, अशा ओळीदेखील ‘फ्लॅश’ होत आहेत. यासंदर्भात प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांच्याशी संपर्क झाला नाही. (प्रतिनिधी)
निकालांसाठी पर्यायी व्यवस्था
विद्यापीठाचे संकेतस्थळ ‘आऊट आॅफ सर्व्हिस’ असल्यासंदर्भात विद्यापीठातील अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता कोणीही यावर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. सर्वांनीच ‘एमकेसीएल’वर खापर फोडले. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.आरटीएमएनयूरिझल्टस्.ओआरजी’ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती परीक्षा नियंत्रक विलास रामटेके यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता निकालांना फटका बसणार नाही, याची काळजी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. एका खासगी कंपनीला याची जबाबदारी देण्यात आली आहे.