हिवाळी परीक्षांसाठी विद्यापीठाचे सावध पाऊल
By Admin | Updated: July 10, 2015 02:50 IST2015-07-10T02:50:14+5:302015-07-10T02:50:14+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल खोळंबले असताना परीक्षा विभागाने हिवाळी परीक्षेसाठी तयारी सुरू केली आहे.

हिवाळी परीक्षांसाठी विद्यापीठाचे सावध पाऊल
निकालांशिवायच पुढील परीक्षेचे वेळापत्रक : १६ आॅक्टोबरपासून सुरुवात होण्याची शक्यता
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल खोळंबले असताना परीक्षा विभागाने हिवाळी परीक्षेसाठी तयारी सुरू केली आहे. हिवाळी परीक्षांना १६ आॅक्टोबरपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे. गोंधळ टाळण्यासाठी परीक्षा विभागातर्फे संभाव्य तारखांची साडेतीन महिने अगोदरच घोषणा करण्यात आली आहे.
परीक्षा नियंत्रक नसल्यामुळे परीक्षा विभाग पूर्णत: कोलमडलेला आहे. मागील वर्षी हिवाळी परीक्षांची योग्य तऱ्हेने तयारी झाली नाही व परीक्षा समोर ढकलण्याची नामुष्की विद्यापीठावर आली होती. यंदादेखील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा समोर ढकलण्यात आल्या होत्या. शिवाय उन्हाळी परीक्षांचे निकाल अद्याप मोठ्या प्रमाणावर रखडले आहे.
त्यामुळे ऐन वेळेवर ताण येऊ नये यासाठी उन्हाळी परीक्षांसंदर्भात परीक्षा विभागाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. याकरिताच ६५४ परीक्षांसाठीचे संभाव्य वेळापत्रक यंदा जुलै महिन्यातच घोषित करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
प्रात्यक्षिक परीक्षांची तारीख नंतर घोषित करण्यात येईल असेदेखील विद्यापीठाकडून कळविण्यात आले आहे.
पाच टप्प्यात होणार परीक्षा
विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा पाच टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने बीए, बीएसस्सी व बीकॉमच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. दुसरा टप्पा ३० आॅक्टोबरपासून सुरू होईल व यात पदव्युत्तर परीक्षांचा समावेश राहणार आहे. हिवाळी परीक्षांच्या तिसऱ्या टप्प्यास ७ नोव्हेंबरपासून सुरुवात होईल व यात अभियांत्रिकी व तांत्रिक विषयांच्या अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा प्रामुख्याने समावेश असेल. २४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या चौथ्या टप्प्यात नियमित सत्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येतील तर १ डिसेंबर रोजी अभियांत्रिकीच्या विषम सत्राच्या परीक्षांना सुरुवात होईल. परीक्षांच्या संभाव्य तारखा विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. (प्रतिनिधी)