विषयनिहाय शुल्काचा विद्यापीठाला पडला विसर
By Admin | Updated: February 11, 2016 03:27 IST2016-02-11T03:27:03+5:302016-02-11T03:27:03+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पुरवणी परीक्षेसाठी सरसकट परीक्षा शुल्क न घेता विषयनिहाय शुल्क घेण्याचा निर्णय घेतला होता.

विषयनिहाय शुल्काचा विद्यापीठाला पडला विसर
अद्यापही अधिसूचना नाही :
विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा आर्थिक फायदा महत्त्वाचा?
योगेश पांडे नागपूर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पुरवणी परीक्षेसाठी सरसकट परीक्षा शुल्क न घेता विषयनिहाय शुल्क घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयाची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही. हिवाळी परीक्षांचे निकाल जाहीर होत असताना विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे. ‘पीएचडी’ शुल्काची अव्वाच्या सव्वा वाढ तत्काळ लागू करणाऱ्या प्रशासनाला विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी ही तत्परता का आठवत नाही, असा संतप्त सवाल व्यक्त करण्यात येत आहे.
विद्यापीठात एक किंवा दोन विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना संपूर्ण परीक्षेचे शुल्क भरावे लागते. या प्रकाराने विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसतो. इतर विद्यापीठांच्या तुलनेत नागपूर विद्यापीठाचे परीक्षा शुल्क अधिक असल्याची विद्यार्थी संघटना व प्राधिकरण सदस्यांकडून ओरड होते. या मुद्यावरून विद्यार्थी संघटनांनी अनेकदा विद्यापीठात आंदोलनेदेखील केली.
विषयनिहाय शुल्क आकारण्याचा प्रस्ताव विद्वत परिषदेत मांडण्यात आला होता. शुल्क आकारणी कशी करावी, यासाठी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली. यात व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. के.सी. देशमुख, अधिष्ठाता डॉ. रवींद्र क्षीरसागर, डॉ. शरयू तायवाडे, वित्त अधिकारी आणि परीक्षा नियंत्रकाचा समावेश करण्यात आला. या समितीने सादर केलेल्या अहवालाला कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी मान्यता दिली होती व लवकरच याची अधिसूचना जाहीर होईल, याची घोषणा केली होती.परंतु प्रत्यक्षात मात्र अडीच महिने उलटून गेल्यावर यासंदर्भातील अधिसूचना जाहीर करण्यात आलेली नाही. यासंदर्भात कुलगुरूंना विचारणा करण्यात आली असता काही तांत्रिक कारणांमुळे याला विलंब झाला असल्याचे त्यांनी मान्य केले. परंतु विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता याची अधिसूचना तत्काळ प्रभावाने जारी करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.