विद्यापीठ सर्वोच्च न्यायालयात जाणार
By Admin | Updated: April 25, 2015 02:20 IST2015-04-25T02:20:36+5:302015-04-25T02:20:36+5:30
वित्त व लेखा अधिकारी पदावर पूरण मेश्राम यांच्या फेरनिवडप्रकरणी विद्यापीठातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

विद्यापीठ सर्वोच्च न्यायालयात जाणार
ंनागपूर : वित्त व लेखा अधिकारी पदावर पूरण मेश्राम यांच्या फेरनिवडप्रकरणी विद्यापीठातील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार मेश्राम यांची पुनर्नियुक्ती झाली होती. या निवडप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची परवानगी राज्यपालांनी विद्यापीठ प्रशासनाला दिली आहे. त्यानुसार विद्यापीठ सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.
७ जुलै २०१४ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मेश्राम यांची पुनर्नियुक्ती करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला. महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार या प्रस्तावाचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यानंतरही तत्कालीन कुलगुरू व विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी सदर प्रकरण कुलपतींकडे सादर केले होते. कुलपतींच्या आदेशानंतर विद्यापीठाने वित्त व लेखा अधिकारी पदाकरिता जाहिरात देऊन अर्ज मागवले होते.
या जाहिरातीनंतर सहा जणांचे या पदासाठी अर्ज आले होते. दरम्यान, याविरुद्ध मेश्राम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. व्यवस्थापन परिषदेच्या प्रस्तावानुसार २९ मे २०१९ पर्यंत पदावर कायम ठेवावे, अशी त्यांची विनंती आहे. मेश्राम यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तात्पुरता दिलासा दिला आहे. त्यांची पुनर्नियुक्ती ३० मे २०१४ पासून ग्राह्य धरण्यात यावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.
या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयात जाण्यासंदर्भात विद्यापीठाने राज्यपाल कार्यालयाचे मत मागितले होते. विद्यापीठाने सर्वोच्च न्यायालयात जायला काहीच हरकत नाही असे उत्तर राज्यपालांकडून आले असून, आता त्यादिशेने तयारी सुरू असल्याची माहिती कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली. (प्रतिनिधी)