विद्यापीठ प्राधिकरणाला मिळणार मुदतवाढ?
By Admin | Updated: July 7, 2015 02:38 IST2015-07-07T02:38:40+5:302015-07-07T02:38:40+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे वर्तमान प्राधिकरणांचा कालावधी ३१ आॅगस्ट रोजी संपुष्टात येणार आहे.

विद्यापीठ प्राधिकरणाला मिळणार मुदतवाढ?
शासनाचा मानस : विद्यापीठ वर्तुळात संभ्रमाचे वातावरण
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे वर्तमान प्राधिकरणांचा कालावधी ३१ आॅगस्ट रोजी संपुष्टात येणार आहे. त्यानंतर निवडणुकांची प्रक्रिया सुरू होईल. परंतु सोमवारी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या झालेल्या चर्चेनंतर एक नवा संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांना एक वर्षाची मुदतवाढ देण्याची अनौपचारिक चर्चा या बैठकीत झाली. त्यामुळे नागपूर विद्यापीठ वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.
येत्या हिवाळी अधिवेशानात काही महत्त्वाच्या सुधारणेसह नवा विद्यापीठ कायदा मंजूर करण्यात येणार असल्याचे संकेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे. यातील सूचनांच्या आधारावरच प्राधिकरण तयार करण्यात येईल, असेदेखील त्यांनी कुलगुरूंना सांगितले.
दरम्यान, नागपूर विद्यापीठात प्राधिकरण निवडणुकांची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकांचे काय होणार, याबाबत तावडे नेमके भाष्य करू शकले नाहीत. प्राधिकरणांना कायद्याला मान्यता देण्याअगोदर मुदतवाढ कशी देता येईल, असा प्रश्न काही कुलगुरूंनी या बैठकीत उपस्थित केला. यासंदर्भात नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.(प्रतिनिधी)