विद्यापीठाच्या परीक्षा रविवारीही
By Admin | Updated: April 6, 2016 03:18 IST2016-04-06T03:18:41+5:302016-04-06T03:18:41+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील उन्हाळी परीक्षांचा लांबलचक कालावधी लक्षात घेता, काही परीक्षा रविवारीदेखील घेण्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा रविवारीही
दोन महिने परीक्षा : ‘बीएस्सी’ परीक्षेचा कालावधी घटणार
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील उन्हाळी परीक्षांचा लांबलचक कालावधी लक्षात घेता, काही परीक्षा रविवारीदेखील घेण्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे. याचा सर्वाधिक फायदा ‘बीएस्सी’ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना होणार असून, परीक्षांचा कालावधी कमी होणार आहे.
नागपूर विद्यापीठाच्या काही अभ्यासक्रमांच्या परीक्षा या चक्क दोन महिन्यांहून अधिक काळ चालणार आहेत. यामुळे निकालदेखील विलंबाने लागणार असल्याने, विद्यार्थी व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत विद्यार्थी संघटनांनी कुलगुरूंकडे परीक्षेचा कालावधी कमी करण्याची विनंतीदेखील केली होती. यानंतर कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी विविध पर्याय तयार केले होते.
साधारणत: शासकीय सुटी व रविवारी विद्यापीठाचे पेपर होत नाहीत. परीक्षेचा कालावधी कमी व्हावा यासाठी रविवारीदेखील परीक्षा घेण्यात यावी. तसेच ५ व्या व ६ व्या सत्राचे पेपर एकाच दिवशी घेतल्यास परीक्षेचा कालावधी १५ दिवसांनी कमी होऊ शकतो, अशा आशयाचे दोन प्रस्ताव प्रशासनाच्या विचारार्थ होते. यासंदर्भात विद्यार्थ्यांचेदेखील मत घेण्यात आले. एकाच दिवशी दोन पेपर घेण्यात आले तर त्यामुळे विद्यार्थ्यांची धावपळ होऊ शकते. त्यामुळे हा प्रस्ताव नाकारला व रविवारच्या प्रस्तावाला सर्वांनी मान्यता दिली, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.(प्रतिनिधी)
अभियांत्रिकीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी १० प्रात्यक्षिक केंद्रे
नागपूर विद्यापीठाच्या वतीने अभियांत्रिकीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षांसाठी १० केंद्रे उभारण्यात येणार आहेत. आतापर्यंत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षांसाठी सुमारे ५० परीक्षा केंद्रे राहायची. त्यासाठी विद्यापीठाला परीक्षकांची नियुक्ती करावी लागायची. परंतु केंद्र कमी केले तरी काम सुरळीतपणे होऊ शकते, हे लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक व नागपूरबाहेर जाणाऱ्या प्रत्येक महामार्गावर एक अशी महाविद्यालयांची प्रात्यक्षिक परीक्षा केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे.