रमजानच्या पवित्र महिन्यात राम-रहिम यांचा अनोखा संगम

By Admin | Updated: July 11, 2015 03:17 IST2015-07-11T03:17:51+5:302015-07-11T03:17:51+5:30

धर्म मानवाने निर्माण केले आणि धर्माधर्मात कालांंतराने तेढ निर्माण झाली. वस्तुत: प्रत्येकच धर्म मानवी जीवनाच्या उन्नततेचा संदेश देणारा आहे.

The unique confluence of Ram-Rahim in the holy month of Ramadan | रमजानच्या पवित्र महिन्यात राम-रहिम यांचा अनोखा संगम

रमजानच्या पवित्र महिन्यात राम-रहिम यांचा अनोखा संगम

रमजान महिन्यात गिरीश ठाकरे यांचे रोजे : मुस्लीम बांधवासह त्यांचा रीतीरिवाज पाळण्याचा प्रयत्न
राजेश पाणूरकर नागपूर
धर्म मानवाने निर्माण केले आणि धर्माधर्मात कालांंतराने तेढ निर्माण झाली. वस्तुत: प्रत्येकच धर्म मानवी जीवनाच्या उन्नततेचा संदेश देणारा आहे. प्रत्येकच धर्माने एका आदिम शक्तीची उपासना आणि प्रार्थना केली आहे. त्याची नावे धर्मसापेक्ष बदलली असली तर ईश्वर, अल्ला, येशू ही शक्ती एकच आहे. पण मानवी अहंकाराने धार्मिक जीवनातला बंधूभाव कमी होतो की काय, अशी स्थिती निर्माण होत असताना काही प्रेरणादायी घटनाही समाजात घडत असतात. धर्माने हिंदू असलेले गिरीश ठाकरे रमजान महिन्यात गेल्या काही वर्षापासून भक्तिभावाने रोजे ठेवत आहेत. ते श्री गणेश आणि रामाचे भक्त आहेतच पण अल्ला आणि ताजुद्दीन बाबांवरही त्यांची नितांत श्रद्धा आहे.
घरात सारेच संस्कार हिंदू धर्माचे आहेत पण हे कुटुंब बाबा ताजुद्दीन यांच्यावरही श्रद्धा ठेवणारे आहे. गिरीश यांचे वडील अशोक यांना १९८० साली ताजुद्दीन बाबांची प्रचिती आली. तेव्हापासून ते बाबांच्या सेवेत आहेत. ताजुद्दीन बाबांच्या आशीर्वादाने त्यानंतर सारेच व्यवस्थित होत गेले आणि ठाकरे कुटुंबाची बाबांवर गाढ श्रद्धा निर्माण झाली. त्यामुळेच माझीही श्रद्धा ताजुद्दीन बाबांवर आहे आणि बाबांच्या दरबारात एका वेगळ्याच प्रसन्नतेची अनुभूती मिळते.
आपसूकच मी बाबांच्या सेवेकडे ओढला गेलो. रमजान महिन्यात एकदा साहिरीच्या कार्यक्रमाचे आयोजन माझे मित्र सिराजभाई शेख यांनी केले. साधरणत: रात्री ३ वाजता भोजन झाले. त्यानंतर मात्र माझ्या सर्व मुस्लिम मित्रांचे रोजे सुरु झाले. बाबांच्या श्रद्धेपोटी मी देखील रोजे करायला प्रारंभ केला आणि मला रोजा करण्याचा काहीही त्रास झाला नाही.
एका वेगळ्याच उर्जेचा अनुभव या पवित्र महिन्यात मला येतो आहे. पहिल्या वर्षी १७ रोजे ठेवले होते पण त्यानंतर मात्र गेली पाच वर्षे मी पूर्ण रोजे करीत आहे, असे गिरीश ठाकरे म्हणाले. माझे हिंदू मित्र आहेत त्यापेक्षा जास्त मुस्लिम मित्र आहेत. जीवाला जीव देणारे हे माझे मित्र आहे. सातत्याने त्यांच्यासह राहताना आपल्या समाजात मुस्लिम बांधवांबाबत काही लोक अकारण गैरसमज निर्माण करतात, असा अनुभवही गिरीश यांनी यावेळी अनुभवला. मी बाबांच्या दरबारात जातो त्याप्रमाणेच माझे अनेक मुस्लिम मित्र शेगावच्या गजानन महाराजांचे दर्शन घेतात. तेथील पावित्र्य त्यांना आवडते. त्यामुळे आमच्यात धार्मिक भेदांचा प्रश्नही निर्माण झाला नाही, असे गिरीश ठाकरे म्हणाले.
घरीच बाबांची चादर
गिरीश यांचे वडील अशोक जेव्हापासून बाबांच्या सेवेत लागले तेव्हाच त्यांनी घरात बाबांची चादर लावली. रोज नमाज आणि पूजा करून येथे बाबांची सेवा केली जाते. पहाटे ५ वाजता दररोज गिरीश ठाकरे नमाज अदा करतात आणि त्यानंतरच त्यांच्या दिनक्रमाला प्रारंभ होतो. ३६ कोटी देवांपेक्षा कुठल्यातरी एकाच ईश्वराला मानणे योग्य आहे, असे गिरीश ठाकरे यांचे मत आहे.

Web Title: The unique confluence of Ram-Rahim in the holy month of Ramadan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.