राजेश पाणूरकर नागपूरमैत्री हा शब्दच सगळ्या नात्यांपलीकडला आहे. प्रत्येक नात्याला काही मर्यादा पडतात, पण मैत्रीला कशाचेच बंधन नसते. मैत्रीचे नाते जातपात, धर्म, प्रदेश, भाषा या साऱ्याच सीमा सहजपणे ओलांडून जाते. रक्ताचे नाते जास्त गडद मानले जाते, पण मैत्री त्याहीपलीकडे असते. डॉ. रवी वानखेडे आणि सलीम चिमठाणवाला यांची मैत्री अशीच. निष्ठा, प्रामाणिकपणा, माणुसकी आणि कमिटमेंट असणारी ही मैत्री साऱ्यांसाठीच एक आदर्श ठरली आहे. मैत्रीचा हा अनोखा बंध खास मैत्रीदिनानिमित्त. संकटाच्या वेळीच माणसाची खरी परीक्षा होते. याच काळात कोण खरा आणि कोण खोटा ते कळते. आपल्या जीवलग मित्रासाठी काहीही करण्याची तयारी असणारे लोक दुर्मिळच. जीवनज्योती बल्ड बँकेचे संचालक डॉ. रवी वानखेडे त्यापैकीच एक. मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या आपल्या मित्राला वाचविण्यासाठी स्वत:ची किडनी दान करणारे डॉ. रवी वानखेडे यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. वानखेडे आणि सलीम चिमठाणवाला हे दोघेही चांगले मित्र. सलीम यांच्या दोन्ही किडन्या २००६ साली अचानक निकामी झाल्याचे निदान झाले आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. जगण्यासाठी दोनच पर्याय होते. नियमित डायलिसिस किंवा किडनीचे प्रत्यारोपण. मध्यमवर्गीय चिमठाणवाला यांच्यासाठी डायलिसिस खर्चिक तर प्रत्यारोपण जवळपास अशक्यच होते. तीन वर्षे या अनिश्चिततेत कसेबसे घालविल्यावर काहीच मार्ग दिसत नव्हता. रोज आपल्या मित्राच्या डोळ्यात दिसणारा मृत्यू रवी वानखेडे यांना अस्वस्थ करणारा होता. अखेर एक दिवस वानखेडे यांनी आपल्या मित्राला किडनी दान देण्याचा संकल्प केला आणि कुटुंबातील सदस्यांना हा निर्णय सांगितला. वानखेडे यांच्या कुटुंबीयांनी यासाठी सहजपणे मान्यता दिली. चाचण्या, कायदेशीर प्रक्रिया सारेकाही आटोपले. किडनीचे प्रत्यारोपण होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या चाचण्याही सकारात्मक आल्या.
हा मैत्रीचा अनोखा बंध
By admin | Updated: August 2, 2015 02:55 IST