दुर्दैवी, मृत्यूनंतरही नातेवाईकांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:07 IST2021-04-18T04:07:23+5:302021-04-18T04:07:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील परिस्थिती गंभीर आहे. रुग्णांना व्हेंटिलेटर मिळत नाही. ऑक्सिजनसाठी धावाधाव सुरू आहे. ...

दुर्दैवी, मृत्यूनंतरही नातेवाईकांची लूट
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील परिस्थिती गंभीर आहे. रुग्णांना व्हेंटिलेटर मिळत नाही. ऑक्सिजनसाठी धावाधाव सुरू आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शासकीय यंत्रणा हतबल दिसत आहे. त्यात अशा संकटकाळात गरजूंची शववाहिकेसाठी लूट करणे सुरू केले आहे. कोविड रुग्णांचे मृतदेह नेण्यासाठी मनपाच्या गाड्या आहेत. परंतु मृत्यू वाढल्याने तत्काळ शववाहिका उपलब्ध करणे शक्य नाही. दुसरीकडे तातडीने रुग्णालयातून मृतदेह स्मशानभूमीवर नेण्यासाठी अडीच ते तीन हजार रुपये आकारले जात आहेत.
शहरात शासकीय व खासगी अशा ११५ हून रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात शंभराहून अधिक खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. रुग्णाचा मृत्यू झाल्यावर मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी मनपाने १६ शववाहिकांची सेवा उपलब्ध केली आहे. मात्र काही खासगी रुग्णालयातील रुग्णवाहिका मृतदेह नेण्यासाठी दोन हजार ते तीन हजार रुपये घेतले जातात. घाट जवळ असला तरी अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
महापालिकेकडून नि:शुल्क शववाहिकेची सेवा आहे. मनपाच्या १६ शववाहिका आहेत. शहरातील दहा झोनमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे शववाहिकांची व्यवस्था केली आहे. शिवाय सहा शववाहिका सिव्हिल लाईन येथील मुख्य कार्यालयात असतात. १० शववाहिका या खासगी संस्थांच्या आहेत. तसेच काही खासगी शववाहिका आहेत. परंतु, मृत्यूसंख्या वाढल्याने त्या कमी पडतात. दुसरीकडे खासगी शववाहिका जादा पैसे घेऊन गरजूंची लूट करीत आहेत.
......
मनपाच्या शववाहिका मोफत
महापालिकेच्या १६ शववाहिकांच्या माध्यमातून शहरात नि:शुल्क सेवा दिली जाते. मागील काही दिवसात मृत्यू वाढले आहेत. कोविड रुग्णांना मनपाच्याच शववाहिकेतून घाटावर नेले जाते.
शववाहिकेसाठी नागरिकांनी महापालिकेच्या झोन कार्यालयात ऑनलाईन तक्रार करावी.
- डॉ. प्रदीप दासरवार, उपायुक्त, मनपा