रेल्वेच्या परवानगीअभावी अंडरब्रीज अधांतरी

By Admin | Updated: November 16, 2015 03:11 IST2015-11-16T03:11:27+5:302015-11-16T03:11:27+5:30

प्रवाशांना सुविधा देण्यासाठी असलेल्या रेल्वे प्रशासनाकडून रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

Underground overnight due to railways permission | रेल्वेच्या परवानगीअभावी अंडरब्रीज अधांतरी

रेल्वेच्या परवानगीअभावी अंडरब्रीज अधांतरी

प्रवाशांची गैरसोय : गेट बंद करण्याची परवानगी मागणार ‘एनएचएआय’
नागपूर : प्रवाशांना सुविधा देण्यासाठी असलेल्या रेल्वे प्रशासनाकडून रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. मानकापूर रेल्वे अंडरब्रीजचे झपाट्याने सुरू असलेले काम बंद पडले आहे. रेल्वेकडून युटिलिटी शिफ्टिंग किंवा आवश्यक सामुग्री पुलाखाली टाकण्यासाठी नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया(एनएचएआय)ला रेल्वेकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
मानकापूरमध्ये रेल्वे उड्डाणपूल तयार झाल्यानंतर रेल्वे फाटक बंद करण्यात आले होते. त्यामुळे साईनगर, ओमनगर, झिंगाबाई टाकळीजवळील नागरिकांना लांब फेरा मारावा लागत होता. रेल्वे गेट पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी मोठे आंदोलन केले होते. आंदोलनाची दखल घेऊन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी मानकापूर रेल्वे गेटला भेट देऊन अधिकाऱ्यांना गेट सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या; सोबतच एनएचएआयला रेल्वे अंडरब्रीज तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर लवकरच रेल्वे अंडरब्रीजचे काम सुरू झाले. २३ कोटी रुपये खर्चून ४० मीटर लांब रेल्वे अंडरब्रीज तयार करण्यात येत आहे. परंतु उशीर होत असल्यामुळे या कामाचा खर्च वाढून नागरिकांनाही त्रास होणार आहे. रेल्वे अंडरब्रीजखाली एनएचएआयला केबल टाकावयाचे आहे. याशिवाय नाल्याचे खोदकाम करावयाचे आहे. या कामासाठी एनएचएआयने रेल्वे गेट बंद करण्याचा प्रस्ताव दिला आहे. (प्रतिनिधी)

चिंचभुवन रेल्वे ओव्हरब्रीजची फाईल मुंबईत अडकली

केंद्र शासनाशी निगडित उपक्रम असूनही रेल्वे आणि एनएचएआयमध्ये समन्वयाचा अभाव आहे. डिझाईनला मंजुरी मिळण्यासाठी फाईल एक वर्ष फिरत राहते. चिंचभुवनमध्ये प्रस्तावित नवा रेल्वे ओव्हरब्रीज त्याचे एक उदाहरण आहे. एमएसआरडीसीतर्फे तयार करण्यात येणाऱ्या रामझुल्याच्या पहिल्या टप्प्यात रेल्वेने कामात बराच वेळ खोळंबा घातला होता. चिंचभुवन आरओबीची फाईल सध्या पुन्हा रेल्वेच्या मुंबई मुख्यालयात पडून आहे.

‘डीआरएम’ला पत्र दिले
मानकापूर रेल्वे अंडरब्रीजचे काम झपाट्याने सुरू होते. युटिलिटी शिफ्टिंगसाठी रेल्वेला परवानगी मागितली, ती मिळाली नाही. याबाबत डीआरएमला पत्र देण्यात आले आहे. रेल्वे लाईनच्या खालून जाणाऱ्या नाल्याचे खोदकाम करावयाचे आहे. रेल्वे गेटही बंद करावे लागेल.’
-श्रीराम मिश्रा, प्रकल्प संचालक, एनएचएआय

‘सीआरएस’ची परवानगी मिळाली
मानकापूर रेल्वे अंडरब्रीजसाठी कमिश्नर आॅफ रेल्वे सेफ्टी (सीआरएस) यांची परवानगी मिळाली आहे. सध्या या कामात काय अडचण आहे, याची माहिती नाही.’
-ओ.पी. सिंह, ‘डीआरएम’ मध्य रेल्वे,
नागपूर विभाग

Web Title: Underground overnight due to railways permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.