संत्रा मार्केट रोडवर अनियंत्रित कारचा धुमाकूळ
By Admin | Updated: June 10, 2014 01:13 IST2014-06-10T01:13:27+5:302014-06-10T01:13:27+5:30
रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील गेटसमोर संत्रा मार्केट रोडवर कारचालकाचा ताबा सुटल्याने अनियंत्रित झालेल्या कारने सात जणांना जखमी केले. कारच्या धडकेत ऑटो व सायकलरिक्षाचे ५0,000 रुपयांचे नुकसान झाले.

संत्रा मार्केट रोडवर अनियंत्रित कारचा धुमाकूळ
सात जण जखमी : संतप्त जमावाकडून कारची तोडफोड
नागपूर : रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील गेटसमोर संत्रा मार्केट रोडवर कारचालकाचा ताबा सुटल्याने अनियंत्रित झालेल्या कारने सात जणांना जखमी केले. कारच्या धडकेत ऑटो व सायकलरिक्षाचे ५0,000 रुपयांचे नुकसान झाले. घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने कारची तोडफोड करून, चालकाला चांगलीच बत्ती दिली. दरम्यान, घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता.
या घटनेतील आरोपी मदनलाल डोंगरे (५0) रा. गोंदिया हा एमएच ३५-सी-२५३६ क्रमांकाच्या फियाट कारने भरधाव वेगात संत्रा मार्केट रोडवरून जात होता. त्याच्या निष्काळजीपणामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीने फुटपाथवर उभ्या असलेल्या ऑटो, सायकलरिक्षा, मोटरसायकल व पायी चालणार्या एका महिलेला धडक दिली. या धडकेत सात जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी झालेल्यांमध्ये ऑटोचालक अब्दुल रफीक अब्दुल हफीक (४५) रा. दिवाणशाह तकिया, मोमीनपुरा, गुड्डू पाटील (३८) रा. जमुनियातला, जिल्हा छिंदवाडा, सायकलरिक्षा चालक मनोज फागुजी भैसारे (५0) रा. शेंडेनगर, टेकानाका, मोटरसायकलवरील शुभम अंबोले (१७), नीळकंठ अंबोले (५५) व प्राची आकरे (१७) सर्व राहणार नवी शुक्रवारी व पादचारी महिला तुळसाबाई पुंडलिक मेश्राम (५८) रा. देवी, जिल्हा छिंदवाडा यांचा समावेश आहे. या धडकेमध्ये ऑटो व सायकलरिक्षाचे ५0 हजाराचे नुकसान झाले आहे. दरम्यान, यावेळी घटनास्थळावर संतप्त झालेल्या नागरिकांच्या जमावाने कारची चांगलीच तोडफोड केली. आरोपीलाही चांगलीच बत्ती दिली. नागरिकांच्या संतापामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. गणेशपेठ पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून जमावाला शांत करीत,मदनलाल डोंगरे याला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)