- नरेश डोंगरे नागपूर - अनियंत्रित बॅटरी कारने एका पाठोपाठ अनेक प्रवाशांना धडक दिली. त्यानंतर ही कार पोर्चमध्ये धडकून बंद पडली. रेल्वेस्थानक परिसरात मंगळवारी दुपारी ही घटना घडली. यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्य रेल्वे स्थानकावर एका खासगी कंपनीच्या माध्यमातून प्रवाशांसाठी तीन बॅटरी कार चालविल्या जातात. यामुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तींना एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर जाण्यासाठी मदत मिळते. मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास नेहमीप्रमाणे स्थानकाच्या प्रवेश द्वाराजवळून एक बॅटरी कार पश्चिमेकडे प्रवाशांना घेऊन जात होती. अचानक कारचालकाला मिरगीचा झटका आला. त्यामुळे या कारने एका मागोमाग दोन-तीन प्रवाशांना धडक दिली. परिणामी जखमी झालेल्या एका प्रवाशाच्या नाकातोंडातून रक्त वाहू लागले. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. अनियंत्रित कार पोर्चमध्ये मॅग्नेटच्या पिल्लरवर जाऊन धडकली.
त्यानंतर अनेकांनी चालकाकडे धाव घेऊन त्याची धुलाई करण्याचा प्रयत्न केला. त्याने हलगर्जीपणे कार चालवून दुसऱ्यांना धडक दिल्याचा प्रवाशांचा गैरसमज झाला होता. मात्र, कारचालकाला अचानक मिरगी आल्यामुळे हा अपघात घडल्याचे लक्षात आल्याने प्रवासी शांत झाले. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी धाव घेऊन जखमी प्रवासी तसेच बेशुद्ध कारचालकाला लगेच मेयो इस्पितळात दाखल केले. त्यानंतर या घटनेची रेल्वे पोलिस ठाण्यात कागदोपत्री नोंद करण्यात आली.
मोठा अपघात टळलाही कार नेहमी फूट ओव्हर ब्रीजवरच्या गर्दीतून या फलाटावरून त्या फलाटावर जात-येत असते. फलाटावर ती पटरीच्या बाजूने चालते. सुदैवाने आज कार पोर्चमध्ये असताना चालकाला मिरगीचा दाैरा आला. अन्यथा पुलावरून खाली येत असताना किंवा एखादी ट्रेन येत असताना त्याला मिरगीचा दाैरा आला असता तर मोठी दुर्घटना घडली असती.
अधिकाऱ्यांकडून गंभीर दखलरेल्वे स्थानकावर २४ तास गर्दी असते. त्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या प्रत्येकाचे पोलिस व्हेरिफिकेशन तसेच वैद्यकीय व्हेरिफिकेशन असणे गरजेचे आहे. आजच्या घटनेतील बॅटरी कारचालकाला मिरगी येते, हे संबंधितांना माहिती नव्हते का, त्याचे मेडिकल फिटनेसचे सर्टीिफिकेट संबंधित कंपनीच्या संचालकांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे सादर केले होते का, असा प्रश्न आहे.