बेशिस्त वाहतुकीवर ‘कंट्रोल’
By Admin | Updated: January 15, 2017 02:43 IST2017-01-15T02:43:21+5:302017-01-15T02:43:21+5:30
बुटीबोरीच्या मुख्य चौकातील वाहतूक तशी सर्वांसाठी डोकेदुखी... हजारो प्रवासी, विद्यार्थी, कंपनीतील कामगार असो

बेशिस्त वाहतुकीवर ‘कंट्रोल’
बुटीबोरीच्या ठाणेदारांनी राबविला अभिनव उपक्रम : प्रवासी वाहनांसाठी केली वेगळी व्यवस्था
गणेश खवसे नागपूर
बुटीबोरीच्या मुख्य चौकातील वाहतूक तशी सर्वांसाठी डोकेदुखी... हजारो प्रवासी, विद्यार्थी, कंपनीतील कामगार असो की बुटीबोरीत नानाविध कामासाठी येणारे नागरिक असो, त्यांना मुख्य चौकातील अनियंत्रित आणि बेशिस्त वाहतुकीचा फटका बसला नाही असे यापूर्वी झाले नाही. यावर तोडगा काढण्यासाठी ठाणेदार हेमंत चांदेवार यांनी ‘मास्टर प्लान’ तयार केला. त्याचाच एक भाग म्हणून बॅरिकेटस् लावून त्यांनी वाहतूक काही प्रमाणात सुरळीत केली. त्यामुळे बेशिस्त वाहतुकीला लगाम लागला असून वाहतूक सुरळीत झाली आहे.
बुटीबोरीचा मुख्य चौक हा गजबजलेला चौक असून तेथे अपघाताची शक्यता खूप जास्त प्रमाणात असायची. ही शक्यता लक्षात घेता ३० नोव्हेंबर २०१६ रोजी बुटीबोरी पोलीस ठाण्यात रुजू झालेले पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार यांनी यावर काही उपाययोजना राबविल्या जाऊ शकतात का, त्यादृष्टीने विचार केला.
सर्वात आधी पोलीस विभागाच्या वतीने वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे ‘बॅरिकेटस्’ची मागणी केली. सहा - सात बॅरिकेटस् आल्यानंतर त्यांनी ते चौकात एका कडेला लावून वर्धा - चंद्रपूरकडे जाणाऱ्या प्रवासी वाहनांसाठी एकप्रकारे जागा करून दिली. त्यामुळे प्रवासी वाहने तेथे थांबल्यानंतर मागाहून येणाऱ्या वाहनांना पुढे जाण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. त्यातच ‘बॅरिकेटस’च्या आत खासगी वाहन कुणी उभे करून ठेवल्यास त्या वाहनाच्या टायरची हवा सोडली जात. विशेष म्हणजे, हा उपक्रम आजही राबविला जात आहे.
यासाठी मुख्य चौकात वाहतूक पोलिसाची नेमणूक केली असून बेशिस्त वाहतूक ‘कंट्रोल’मध्ये आणली आहे. ठाणेदार हेमंत चांदेवार यांनी राबविलेल्या या उपक्रमामुळे मुख्य चौकातील वाहतूक सुरळीत झाली असून नागरिकांना रस्ता क्रॉस करण्यासाठीही आता तेवढा त्रास सहन करावा लागत नाही. परिणामी त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.
सीसीटीव्ही, ट्रॅफिक सिग्नलची गरज
मुख्य चौकातून दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. वर्दळीचा चौक म्हणून ओळख असलेल्या बुटीबोरी चौकाएवढी वाहतूक इतर कोणत्याही पोलीस ठाण्यांतर्गत नाही. मात्र त्यामानाने आमच्याकडे मनुष्यबळ नसल्याने आम्हालाही मर्यादा येतात. तरीही वाहतूक सुरळीत करण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न सुरूच आहे. त्याअंतर्गत बॅरिकेटस्चा प्रयोग राबविण्यात आला. चौकातील वाहतूक आणखी सुरळीत होण्यासाठी चौकात ट्रॅफिक सिग्नलची नितांत गरज आहे. त्यासोबतच सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यास आपोआपच वाहतुकीवर ‘कंट्रोल’ आणता येईल. पोलीस विभाग आपल्या परीने जे काही करता येईल, ते करीत आहेच. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, ग्रामपंचायत, आरटीओ, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या सीईओ यांनीही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
- हेमंत चांदेवार,
पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन बुटीबोरी.
असा आहे ‘मास्टर प्लान’
बुटीबोरीच्या मुख्य चौकासह एकूणच वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक, तहसीलदार, आरटीओ यांच्याकडे पत्र पाठविले आहे. त्यात एमआयडीसी चौक येथे फुटपाथकडील भागात डांबरीकरण करण्यात यावे, त्रिमूर्ती बिल्डिंगसमोरील सुकलेले झाड काढण्यात यावे, एमआयडीसी चौक येथे वाहतूक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी, टोल टॅक्स घेणाऱ्या कंपनीकडून रात्रीच्या वेळी एमआयडीसी चौक येथे चकाकणारे जॅकेट परिधान केलेले चार कर्मचारी नेमण्यात यावे, ग्रामपंचायत आणि महामार्ग प्राधिकरणाकडून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची व्यवस्था करावी, हायवे अॅथॉरिटीकडून दिशादर्शक फलक लावण्यात यावे, झेब्रा क्रॉसिंग, स्पीड लिमिटवर उपाय, स्पीड ब्रेकर आदी व्यवस्था करण्यात यावी, एमआयडीसी चौकात असलेले दारूचे दुकान दुसरीकडे स्थलांतरित करण्यात यावे आदी सूचना ठाणेदार चांदेवार यांनी केल्या आहे. या सूचनांचे पत्र त्यांनी संबंधितांना १४ डिसेंबर २०१६ रोजी पाठविले आहे. परंतु, अद्याप संबंधितांनी त्याची दखलच घेतलेली नाही. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेबाबत प्रशासन किती सुस्त आहे, याचा प्रत्यय येतो.