काचा फुटल्या, तडेही गेले!
By Admin | Updated: April 26, 2015 02:27 IST2015-04-26T02:27:26+5:302015-04-26T02:27:26+5:30
खुर्ची हलायला लागली. गरगरल्यासारखे होऊ लागले. काही जण सोफ्यावर तर काही जण पलंगावर बसून होते.

काचा फुटल्या, तडेही गेले!
नागपूर : खुर्ची हलायला लागली. गरगरल्यासारखे होऊ लागले. काही जण सोफ्यावर तर काही जण पलंगावर बसून होते. एकदोन जण खुर्चीवर बसले होते. इतक्यात कंपन झाल्यासारखे वाटले. आपला भास असेल असे क्षणभर वाटले मात्र बाहेर लगेच आरडाओरड सुरू झाली. कार्यालयात काम करीत असताना ११.३० ते ११.५० वाजताच्या सुमारास अचानक खुर्ची ‘व्हायब्रेट’ होऊ लागली. टेबलावरील पाण्याचा ग्लासही हलायला लागला. अचानक घर हादरल्यासारखे झाले, त्याचक्षणी हॉलमधील कपाटाची काच फुटली. त्यावेळी काहीच कळेनासे झाले होते. दुसऱ्या मजल्यावरील पायऱ्यांनी खाली उतरत असताना अचानक इमारत हादरल्यासारखी झाली. परंतु हे काही क्षणासाठी होते. यामुळे त्यावेळी काहीच असे वाटले नाही. टीव्हीवर भूकंपाचे वृत्त पाहिल्यानंतर कळले. शनिवारी नागपूरकरांनी अनुभवलेला भूकंप असा होता.
नागरिकांची तारांबळ
अष्टविनायक आराधना इमारतीपासून काही अंतरावर असलेल्या क्रिष्णा रिजेन्सी या चार माळ्याच्या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनाही भूकंपाचे धक्के जाणवले. येथील नागरिकांशी चर्चा केली तेव्हा त्यांनी आपले अनुभव सांगितले. या इमारतीत राहणाऱ्या सुनंदा सागोरे यांनी सांगितले की, मी खोलीत बसले होते. माझी मुलगी पलंगावरच होती. दरम्यान पलंग जोरात हलला. तेव्हा पलंग का हलवितेस म्हणून माझी मुलगी माझ्यावरच ओरडली. याच इमारतीतील विश्रांती सुटे आणि भावना वालदे यांनी सांगितले की, मी सोफ्यावर बसून होते. अचानक सोफा हलल्याचे जाणवले. काही कळण्यापूर्वीच इमारतीतील इतर लोकांची आरडा ओरड सुरू झाली. सर्वजण खाली उतरलो.
एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत बसलो
उत्तर नागपुरातील राजेश रंगारी, लॅन्सी स्वॉमी, प्रवीण पाटील आणि मुकेश साधवानी यांनी सांगितले की, अष्टविनायक आराधना या इमारतीमध्ये आम्ही व इतर काही जण आमदार मिलिंद माने यांच्यासोबत त्यांच्या घरी बसून चर्चा करीत होते. काही जण सोफ्यावर तर काही जण पलंगावर बसून होते. एकदोन जण खुर्चीवर बसले होते. इतक्यात कंपन झाल्यासारखे वाटले. सोफा हलला, पलंगही हलले. सर्वजण एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत बसलो. कुणीच काही बोलले नाही. आपला भास असेल असे क्षणभर वाटले मात्र बाहेर लगेच आरडाओरड सुरू झाली आणि आम्ही धावत खाली आलो तर शेकडो लोकांची गर्दी खाली होती. तेव्हा आपला भास नसून ते भूकंपाचे धक्के होते, याची खात्री बसली.
श्रीराम टॉवर्समधील कर्मचारी बाहेर पडले
नागपूर सुधार प्रन्यास कार्यालयाच्या बाजूलाच असलेल्या श्रीराम टॉवर्सच्या ८ व ९ व्या माळ्यावरील कर्मचाऱ्यांना धक्के जाणवले. हा भूकंपाचा प्रकार असल्याची जाणीव होताच त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने इमारतीच्या तळमजल्याकडे धाव घेतली. लिफ्टचा वापर न करता पायऱ्यांनी ते खाली आले. काहींनी टेरेसकडे धाव घेतली. आठव्या मजल्यावर मायएफएम चे कार्यालय आहे. येथे सकाळी ११.४५ च्या सुमारास शुटींगचे काम सुरू होते. सर्व कर्मचारी यात व्यस्त असताना कार्यालय हलायला लागले. खिडक्यांचे तावदान हलत असल्याचे निदर्शनास आले. हा भूकंपाचा प्रकार असल्याची जाणीव होताच आम्ही तातडीने कार्यालयातून बाहेर पडल्याची माहिती कार्यक्रम प्रमुख मनीष कुमार यांनी दिली. आर.जे.मिलिंद, प्रीती ,श्रुती व अंकित आम्ही सहकाऱ्यासोबत कार्यक्रमात व्यस्त असताना अचानक माझी खुर्ची हलायला लागली. गरगरल्यासारखे होऊ लागले. सर्वाना असे व्हायला लागल्याने हा भूकंपाचा प्रकार असल्याचे लक्षात आले. खबरदारी म्हणून आम्ही कार्यालयातून तातडीने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात आम्ही सर्वजण खाली आल्याची माहिती आर.जे.प्रीती हिने दिली. इमारतीच्या टेरेसवर जायचे की खाली उतरायचे असा काही वेळ गोंधळ उडाला होता. नवव्या माळ्यावर रेस्टरंन्ट आहे. यातील कर्मचाऱ्यांनी टेरेसवर जाणे पसंत केले. ग्रामीण भागातूनही काहींनी मोबाईलवरून भूकंपाची विचारणा केली. रामटेक येथील दोन बहिणी अभ्यास क रीत असताना त्यांना सौम्य धक्के जाणवल्याची माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.