उमरेडच्या ‘सच्चिदानंद’ची पत घसरली
By Admin | Updated: July 23, 2015 02:56 IST2015-07-23T02:56:30+5:302015-07-23T02:56:30+5:30
बुधवार पेठेतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या आणि गावात आपली वेगळी ‘पत’ निर्माण करणाऱ्या सच्चिदानंद सहकारी पतपुरवठा संस्थेच्या कार्यप्रणालीवर ‘अर्थचक्राचे काळे ढग’ दिसू लागले आहेत.

उमरेडच्या ‘सच्चिदानंद’ची पत घसरली
अभय लांजेवार उमरेड
बुधवार पेठेतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या आणि गावात आपली वेगळी ‘पत’ निर्माण करणाऱ्या सच्चिदानंद सहकारी पतपुरवठा संस्थेच्या कार्यप्रणालीवर ‘अर्थचक्राचे काळे ढग’ दिसू लागले आहेत. आपल्या घामाचा पैसा गुंतवल्यानंतर मुदतीअंती आपली रक्कम व्याजासह परत मागण्यासाठी अनेकजण या संस्थेच्या दोनमजली इमारतीत सध्या येरझाऱ्या मारीत आहेत.
संस्थेत येणाऱ्यांना ‘सध्याच पैसे नाही, आणखी काही दिवस थांबा’ अशापद्धतीने थांबविले जाते. यामुळे आल्यापावलीच निराशेने परत जाण्याचा प्रकार गुंतवणूकदारांसोबत होत असून आपल्याच पैशासाठी अनेकदा चकरा मारणाऱ्यांमध्ये कमालीचा संताप पसरला आहे. तर दुसरीकडे संस्थेने जोरजबरदस्तीने ‘तारखेवर तारीख’ वाढवून देण्याचा सपाटाच सुरू केल्याच्या असंख्य तक्रारी आहेत.
उमरेडच्या दुय्यम निबंधक कार्यालयाकडे याबाबतच्या तक्रारी केल्या जात असून दुय्यम निबंधक ‘तुम्ही मला विचारून रक्कम ठेवली होती का’ अशा शब्दात आमची हेटाळणी करीत असल्याचा आरोपही नागरिकांचा आहे.
सुमारे दीड-दोन वर्षांपासून संस्थेचे पदाधिकारी आपला हालहवाल लोकांपुढे पोटतिडकीने मांडत रकमेसाठी चालढकलपणा करीत आहेत. वर्ष उलटूनही अद्याप या पदाधिकाऱ्यांनी कोणतीच ठोस उपाययोजना केली नसल्याने या सहकारी पतपुरवठा संस्थेत पैसा गुंतवणे गुंतवणूकदारांसाठी धोक्याची घंटा तर ठरणार नाहीना, अशी शंकेची पाल चुकचुकत आहे. (क्रमश:)
‘लाल’ झाले कोण?
संस्थेलगत प्राचीन प्रसिद्ध लाल गणपतीचे मंदिर आहे. नेमके हेच नाव हेरून आणि भाविकांच्या आस्थेचा लाभ आपल्या पदरात पाडून घेण्याच्या अनुषंगाने संस्थेने ‘लाल गणपती’ या नावाने योजना आखली. पाच वर्षात दामदुप्पटीचे आमिषही नागरिकांना दाखविले. सन २००९-१० या आर्थिक वर्षात सुरू करण्यात आलेल्या या योजनेत शेकडो लोकांनी उड्या मारल्या. जवळपास १ कोटी २० लाख रुपयांची गुंतवणूक या योजनेत नागरिकांनी केली. नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभताच सन २०१०-११ या वर्षात ‘चिंतामणी योजना’ जाहीर झाली. या योजनेवरही अनेकजण तुटून पडले. सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांची गुंतवणूक या योजनेत नागरिकांनी केली. पाच वर्ष संपले. ठेवीचे सहावे वर्षही सुरू झाले. परंतु दामदुप्पट रक्कम मिळाली नाही. सुमारे पाच कोटी रुपयांच्या आसपास या गुंतवणूकदारांना रक्कम परत करावयाची आहे. सोबतच यथाशक्ती मुदत ठेव योजनेतही एक, तीन आणि पाच वर्षांसाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक गुंतवणूकदारांनी केली. ही रक्कमही अनेकांची संस्थेत अडकली आहे. अडकलेल्या रकमेचा हा गुंता संस्था सोडविणार कधी, असा सवाल शेकडो गुंतवणूकदार आता विचारीत आहेत.
लोकमत
विशेष