उमरेड तालुक्यात ‘तेच चेहरे’ पुन्हा मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:10 IST2021-07-07T04:10:04+5:302021-07-07T04:10:04+5:30
उमरेड : उमरेड तालुक्यातील पंचायत समितीच्या देवळी (आमगाव) आणि मकरधोकडा या दोन गणासाठी सर्वसाधारण गटाकरिता निवडणूक जाहीर झाली आहे. ...

उमरेड तालुक्यात ‘तेच चेहरे’ पुन्हा मैदानात
उमरेड : उमरेड तालुक्यातील पंचायत समितीच्या देवळी (आमगाव) आणि मकरधोकडा या दोन गणासाठी सर्वसाधारण गटाकरिता निवडणूक जाहीर झाली आहे. यापैकी मकरधोकडा गण महिला उमेदवारांसाठी राखीव आहे. भाजपने एका ठिकाणी बदल केला असून, काँग्रेसने जुन्याच उमेदवारांना पसंती दिली आहे. सोमवारी अखेरच्या दिवशी दोन्ही गणातून एकूण ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
देवळी (आमगाव) गणात सर्वसाधारण गटासाठी एकूण सात जणांनी उमेदवारी अर्ज सादर केला. सर्वसाधारण महिला राखीव गणासाठी असलेल्या मकरधोकडा गणात महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नितीन पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद कदम यांची यावेळी उपस्थिती होती.
देवळी (आमगाव) गणात सुरेश दयाराम लेंडे (काँग्रेस), राजकुमार पुंडलिक लोखंडे (बहुजन समाज पार्टी), दिलीप धोंडबा कोल्हे (भाजप), संदीप श्रावण भुसारी (भाजप), हर्षानंद गुलाब भगत (वंचित बहुजन आघाडी), सचिन विजय दहीकर (गोंडवाना गणतंत्र पार्टी), गजानन किसन सडमाके (शिवसेना) या सात उमेदवारांनी अर्ज दाखल केला. तहसील कार्यालयाच्या बाहेर गर्दी दिसून आली असली तरी, उमेदवारी अर्ज सादर करताना मोजक्याच जणांना प्रवेश देण्यात आला होता. कोरोना साथीचा प्रकोप लक्षात घेता प्रशासनाने योग्य खबरदारी घेतली.
मकरधोकडा पंचायत समिती गणात शालू धनराज गिल्लूरकर (काँग्रेस), मीनाक्षी मनोहर कावटे (भाजप), कविता वसंता निकोसे (वंचित बहुजन आघाडी), पंचफुला किसनाजी कुहीटे (शिवसेना) या चार उमेदवारांनी अर्ज सादर केला.
-------
ना इकडे, ना तिकडे
मागील निवडणुकीत देवळी (आमगाव) गणात भाजपाकडून उमेदवारी मिळालेल्या हिरामण नागपुरे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काही दिवसापूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. ते पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आहेत, हे येथे विशेष. मागील निवडणुकीत नागपुरे (भाजप) यांनी सुरेश लेंडे (काँग्रेस) यांच्याशी दोन हात केले होते. लेंडे विजयी ठरले. या निवडणुकीत भाजपमध्ये दुसरा चेहरा समोर येत असल्याचे लक्षात येताच यंदा काँग्रेसने आपल्याला उमेदवारी द्यावी, अशी फिल्डिंग नागपुरे यांनी लावली होती. प्रचंड रस्सीखेच सुरू असतानाच अखेर पक्षाने पुनश्च एकदा सुरेश लेंडे यांच्यावर विश्वास दाखविला. दुसरीकडे नागपुरे यांना ना इकडे उमेदवारी मिळाली ना तिकडे.
----
फोटो : उमरेड तालुक्यातील देवळी (आमगाव) गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना सुरेश लेंडे.