नागपूर जिल्ह्यातील उमरेडमध्ये धावत्या दुचाकीवर बिबट्याने घेतली उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 10:56 IST2018-04-24T10:56:32+5:302018-04-24T10:56:41+5:30
उमरेड येथून गावाकडे परत येणाऱ्या दुचाकीवर अचानक बिबट्याने उडी मारली. त्यात दुचाकीचालक जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. २२) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास चिकना गावालगत घडली.

नागपूर जिल्ह्यातील उमरेडमध्ये धावत्या दुचाकीवर बिबट्याने घेतली उडी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उमरेड येथून गावाकडे परत येणाऱ्या दुचाकीवर अचानक बिबट्याने उडी मारली. त्यात दुचाकीचालक जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. २२) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास चिकना गावालगत घडली.
शेषराव बाबुराव रामटेके (२८, रा. चिकना) असे जखमीचे नाव आहे. ते पत्नी मंदा (३५) यांच्यासह उमरेड येथे दुचाकीने कामानिमित्त गेले होते. उमरेड येथून ते सायंकाळच्या सुमारास गावाकडे येण्यास निघाले. दरम्यान, चिकना गावापासून अवघ्या एक कि.मी. अंतरावर रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवर उडी मारली. त्यात शेषराव यांच्या डाव्या पायाला बिबट्याचा पंजा लागून पॅन्ट फाटला. बिबट्याने केलेल्या अचानक हल्ल्यामुळे रामटेके दाम्पत्य चांगलेच घाबरले. मात्र त्यांनी आरडाओरड करताच बिबट्याने जंगलाकडे धूम ठोकली. यानंतर ते गावात आले आणि आपबिती पोलीसपाटलांना सांगितली. त्यांनी लगेच याबाबत वन विभागाला माहिती दिली. वन विभागाची चमू लगेच गावात दाखल होऊन जखमी शेषराव यांना मांढळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले. तेथे डॉक्टरांनी प्रथमोपचार केल्यानंतर नागपूरच्या वैद्यकीय रुग्णालय (मेडिकल) पाठविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांच्यावर मेडिकलमध्ये उपचार करण्यात आले.
याबाबत वन परिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे, राऊंड आॅफिसर डी. बी. आरीकर यांनी अहवाल वरिष्ठांकडे पाठविला. शेषराव रामटेके यांना तातडीची दोन हजार रुपयांची मदत वन विभागातर्फे करण्यात आली.