‘मिनीबार’चा अखेर बंदोबस्त

By Admin | Updated: January 17, 2017 01:44 IST2017-01-17T01:44:49+5:302017-01-17T01:44:49+5:30

हुडकेश्वर रोडवरील इंगोलेनगर चौकातील खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर दारूच्या बाटलीसह, पाणीपाऊच व ग्लासची व्यवस्था करून दिली जात असल्याने सूर्य मावळताच येथे ‘तळीरामां’ची जत्रा भरली जायची.

Ultimate settlement of 'minibar' | ‘मिनीबार’चा अखेर बंदोबस्त

‘मिनीबार’चा अखेर बंदोबस्त

खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर कारवाई : इंगोलेनगरातील तळीरामांच्या जत्रेला ‘ब्रेक’
नागपूर : हुडकेश्वर रोडवरील इंगोलेनगर चौकातील खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर दारूच्या बाटलीसह, पाणीपाऊच व ग्लासची व्यवस्था करून दिली जात असल्याने सूर्य मावळताच येथे ‘तळीरामां’ची जत्रा भरली जायची. चौकातून रहदारी करणारे सामान्य पादचारी व महिलांची मोठी कुचंबणा व्हायची. गेल्या अनेक वर्षांपासून हा उघड्यावर मिनी बीअरबार सुरू होता.

‘मिनीबार’चा अखेर बंदोबस्त
‘लोकमत’ने ‘इंगोलेनगर चौकात भरते तळीरामांची जत्रा’ या मथळ्याखाली सोमवारी वृत्त प्रसिद्ध करताच खळबळ उडाली. हुडकेश्वर पोलिसांच्या उपस्थित महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने चौकातील सर्व हातागाड्यांवर कारवाई केली.
इंगोलेनगर चौकातील तथाकथित मिनीबार सामान्यांसाठी डोकेदुखी ठरला होता. या अवैध मिनीबारवर आधारित अनेक व्यवसाय फुलले होते. जवळच्या वाईन शॉप किंवा देशी दारूच्या दुकानामधून दारूची बाटली विकत घेऊन तळीराम या हातगाड्यांवर यायचे. तीन रुपयांचे पाणीपाऊच, पाच रुपयांचे एक अंडे किंवा शेंगदाण्याचे पॅकेट घेऊन चौकात बिनधास्तपणे दारू रिचवायचे. उघड्यावर सहज दारू पिता येत असल्याने सायंकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत दारूच्या पार्ट्या चालात होत्या.
चौकातच असलेल्या रिकाम्या लॉनच्या जागेचा वापरही या पार्ट्यासाठी व्हायचा. दारूची नशा चढल्याने भांडणे, मारामारी नेहमीचे झाले होते. ‘लोकमत’ चमूच्या पाहणीत या चौकातील हातठेल्यांवर मद्य पिणाऱ्यांमध्ये तरुण मोठ्या प्रमाणात येत असल्याचे दिसून आले. बारमध्ये बसून मदिरेचा प्याला ओठाला लावणे खिशाला परवडत नसल्यामुळे हे तरुण या चौकातील अवैध मिनीबारचा आश्रय घेत होते. वशेष म्हणजे, या हातगाड्यांवर मजूरवर्गच नव्हे तर मध्यमवर्गीय व श्रीमंत लोकही गर्दी करायचे. या चौकातून दररोज रहदारी करणाऱ्या नागरिकांना, शाळेतील विद्यार्थ्यांना, महिलांना हा समाजविघातक धंदा दिसत होता, परंतु शहरातील पोलीस प्रशासनाला का नाही दिसत? हा जनसामान्यांचा प्रश्न होता. पोलिसांनाही या मिनीबारवाल्यांचा हप्ता पोहचतो की, काय असे वाटावे एवढी भीषण परिस्थिती घटनास्थळावर गेल्यावर दिसून आली होती. या रस्त्यांनी व चौकातून जाताना कुणी दारुडा अंगावर येऊन काय करेल याचा नेम राहिला नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत होती. याला ‘लोकमत’ने १६ जानेवारीच्या अंकात वाचा फोडली.


अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई
‘लोकमत’च्या वृत्ताची दखल महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने घेतली. सायंकाळी इंगोलेनगर चौकात खाद्यपदार्थांचे हातठेले लागताच पथकाने पोलिसांच्या सहकार्याने आठ हातगाड्यांवर कारवाई केली. हातगाड्यांमधील सामान जप्त केले, तर काही हातठेले हटविण्यात आले.

चौकात पोलिस तैनात
इंगोलेनगर चौकात सोमवारी सायंकाळी हुडकेश्वर पोलीस ठाण्यातील पोलिसांचा बंदोबस्त पहायला मिळाला. पोलीस दिसताच अनेकजण चौकात न थांबताच सामोर जाऊन कानोसा घेत असल्याचे दिसून आले. बऱ्याच वर्षानंतर चौकातील तळीरामांच्या जत्रेला ब्रेक लागल्याने लोकांनी याचे स्वागत केले.

Web Title: Ultimate settlement of 'minibar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.