उज्ज्वला पाटील परसाडच्या सरपंचपदी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:13 IST2020-12-30T04:13:40+5:302020-12-30T04:13:40+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : परसाड (ता. कामठी) येथील सरपंच उज्ज्वला पाटील यांच्या विराेधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव पारित ...

उज्ज्वला पाटील परसाडच्या सरपंचपदी कायम
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : परसाड (ता. कामठी) येथील सरपंच उज्ज्वला पाटील यांच्या विराेधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव पारित केला. मात्र, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशान्वये या अविश्वास प्रस्तावावर मते जाणून घेण्यासाठी विशेष ग्रामसभा व मतदान घेण्यात आले. यात ३०१ ग्रामस्थांनी प्रस्तावाच्या बाजूने तर ३२४ जणांनी विराेधात मतदान केल्याने उज्ज्वला पाटील यांचे सरपंचपद कायम राहिले. विशेष ग्रामसभेत अविश्वास प्रस्ताव नाकारल्याचा हा तालुक्यातील पहिलाच प्रकार हाेय.
परसाड ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक २५ ऑक्टाेबर २०१७ मध्ये पार पडली. त्यात उज्ज्वला पाटील या मतदारांमधून सरपंचपदी निवडून आल्या. या ग्रामपंचायतमधील विराेधी गटाचे प्रशांत झाडे, कल्पना टाले, जितेंद्र डाफ, कांता गावंडे, प्रियंका राऊत, आशिष मानवटकर व रंजना माटे हे सात सदस्य निवडून आले. त्यामुळे त्यांनी उज्ज्वला पाटील यांच्यावर अविश्वास घेण्यासंदर्भात तहसीलदार अरविंद हिंगे यांना निवेदन दिले. तहसीलदार हिंगे यांनी २८ मार्च राेजी ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा बाेलावली. त्या सभेत सरपंच उज्ज्वला पाटील यांच्या विराेधातील अविश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला.
तहसीलदार अरविंद हिंगे यांनी हा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे पाठविला. त्यांच्या सूचनेनुसार परसाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विशेष ग्रामसभेचे आयाेजन करण्यात आले. त्यात या प्रस्तावावर चर्चा करून ग्रामस्थांना मतदान करण्याची सूचना करण्यात आली. खंडविकास अधिकारी अंशुजा गराटे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. यात परीविक्षाधीन तहसीलदार जितेंद्र शिंतोडे, मंडळ अधिकारी संजय अनवाणे, तलाठी राहुल भुजाडे, ग्रामविकास अधिकारी एस. साखरे यांनी सहकार्य केले.
...
गुप्त मतदान घेण्याची सूचना
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशानुसार हा अविश्वास प्रस्ताव चर्चेसाठी मंगळवारी (दि. २९) सकाळी ११ वाजता विशेष ग्रामसभेत ठेवण्यात आला. दुपारी १२ वाजता गुप्त मतदानाला सुरुवात झाली. यात ६६७ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर मतमाेजणी करण्यात आली. त्यातील ६२५ मते वैध व ४२ मते अवैध ठरविण्यात आली. यात ३०१ नागरिकांनी प्रस्तावाच्या बाजूने तर ३२४ नागरिकांनी प्रस्तावाच्या विराेधात मतदान केल्याने हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले.