उज्ज्वल निकम यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार
By Admin | Updated: January 3, 2015 02:37 IST2015-01-03T02:37:38+5:302015-01-03T02:37:38+5:30
पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा मानाचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार यंदा ख्यातनाम विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना जाहीर झाला आहे.

उज्ज्वल निकम यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार
नागपूर : पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा मानाचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार यंदा ख्यातनाम विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना जाहीर झाला आहे. सायंटिफिक सभागृहात १० जानेवारीला सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या समारंभात अॅड. निकम यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
२६/११ च्या हल्ल्यातील पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला फाशीची शिक्षा होईपर्यंत कायदेशीर लढाई लढणारे अॅड. निकम देशविदेशात प्रसिद्ध आहेत. कसाबविरुद्ध १३०० पानांचे आरोपपत्र दाखल करतानाच या खटल्यात बचाव पक्षाला कसलीही संधी मिळू नये, याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली होती. त्यापूर्वी संगीतकार नदिम, संजय दत्त, प्रमोद महाजन आणि खैरलांजी हत्याकांडासारखे अनेक बहुचर्चित खटले सरकारच्या वतीने लढून आरोपींचा दोष सिद्ध करण्यात त्यांनी यश मिळवले आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी यंदाच्या जीवन गौरव पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आल्याचे पद्मगंधातर्फे कळविण्यात आले आहे.
यापूर्वी हा पुरस्कार कर्मयोगी बाबा आमटे, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. विजय भटकर, डॉ. रघुनाश माशेलकर, डॉ. डी. बी. शेकटकर, प्राचार्य डॉ. राम शेवाळकर, डॉ. द. भि. कुलकर्णी, डॉ. अनंत लाभसेटवार, शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे आदींना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)