यूसीएन कॅच आ ऊ ट !
By Admin | Updated: March 26, 2015 02:32 IST2015-03-26T02:32:24+5:302015-03-26T02:32:24+5:30
करोडो रुपयांचा करमणूक कर थकीत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर विभागाच्या चमूने यूसीएन केबल नेटवर्कच्या रामदासपेठ येथील कार्यालयाला सील ठोकले.

यूसीएन कॅच आ ऊ ट !
नागपूर : करोडो रुपयांचा करमणूक कर थकीत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर विभागाच्या चमूने यूसीएन केबल नेटवर्कच्या रामदासपेठ येथील कार्यालयाला सील ठोकले. ही कारवाई बुधवारी दुपारी २.३० वाजता झाली. परंतु गुरुवारी भारत-आॅस्ट्रेलियादरम्यान होणाऱ्या क्रिकेट मॅचमुळे तब्बल पाच तास प्रसारण थांबविल्यानंतर प्रशासनाने १६.५० लाख रुपये घेऊन कारवाई तात्पुरती मागे घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, यूसीएन केबल नेटवर्कवर १ एप्रिल २०१३ पासून आतापर्यंत ५५ कोटी रुपयांपेक्षा अधिक करमणूक कर थकीत आहे. थकीत कर भरण्यासाठी प्रशासनातर्फे अनेकदा सांगण्यात आले. वारंवार सूचना देण्यात आली, परंतु त्याला गांभीर्याने घेण्यात आले नाही. शेवटी बुधवारी करमणूक कर विभागाच्या एका पथकाने यूसीएनच्या कार्यालयाला सील ठोकले. यानंतर नागपूर शहरासह विदर्भातील बहुतांश भागातील यूसीएनचे प्रसारण ठप्प पडले.
पाच तास प्रसारण बंद राहिले. त्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष पसरू लागला. प्रशासनाने गुरुवारी होणारा क्रिकेट सामना लक्षात घेऊन अखेर ७.३० वाजता दरम्यान यूसीएनसोबत एक करार करीत थकीत रक्कम भरण्यास सांगितले. १६.५० लाख रुपयांची रक्कम यूसीएनकडून भरण्यात आली आणि ३१ मार्चपूर्वी उर्वरित रक्कम भरण्याच्या आश्वासनानंतर कारवाई मागे घेण्यात आली. त्यानंतर प्रसारण पुन्हा सुरू झाले.
प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
बुधवारी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे केबल आॅपरेटरमध्ये खळबळ उडाली तर दुसरीकडे केबल ग्राहकांमध्ये असंतोष पसरला आहे. सध्या क्रिकेटचा वर्ल्डकप सुरू आहे. गुरुवारी भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सेमी फायनलचा सामना खेळला जाणार आहे. अशा परिस्थितीत ही कारवाई केली असल्याने ग्राहक संतापले आहेत. मागील दोन वर्षांपासून करोडो रुपयांचा कर थकीत होता तेव्हा प्रशासन झोपले होते का? प्रशासनाची ही कारवाई ग्राहकांवर अन्याय करणारी आहे. कारण ग्राहकांकडून दर महिन्याला केबलचे शुल्क वसूल केले जात आहे. तेव्हा अचानकपणे प्रसारण थांबविण्याचे कारण काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
न्यायालयात जाण्याचा इशारा
थकीत कराची वसुली करतांना सामान्यजनांना प्रशासनातर्फे वेठीस धरले जाते. परंतु करोडो रुपयांचे कर थकीत ठेवणाऱ्यांवर मात्र कारवाई होत नसल्याची बाब या घटनेतून समोर आली आहे. त्यामुळे सामान्यजनांवर बळजबरी करून मोठ्या असामींना रान मोकळे करण्याच्या या प्रकाराविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा शहरातील अनेक सामाजिक संघटनांनी दिला आहे.
कारवाई नव्हे अफवा
३१ मार्चपूर्वी करण्यात येणाऱ्या तांत्रिक अपग्रेडेशनच्या प्रक्रियेसाठी यूसीएनचे प्रसारण बुधवारी बंद ठेवण्यात आले होते. परंतु काही लोक यासंबंधात कारवाई झाल्याची अफवा पसरवीत आहेत, परंतु यात काहीही तथ्य नाही. अपग्रेडेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रसारण पुन्हा सुरू करण्यात आले. गुरुवारी होणारा भारत-आॅस्ट्रेलियाचा क्रिकेट सामना ग्राहक कुठल्याही अडचणींशिवाय पाहू शकतील.
- आशुतोष काणे, संचालक : यूसीएन केबल नेटवर्क
पुन्हा होणार कारवाई
यूसीएन केबल नेटवर्कवर मागील दोन वर्षांपासून करमणूक कर थकीत आहे. तो चुकविला नसल्याने बुधवारी सील करण्याची कारवाई करण्यात आली. केबल संचालक ग्राहकांकडून नियमितपणे कराचे शुल्क वसूल करीत आहेत. परंतु शासनाला मात्र कर देण्यात आलेला नाही. गुरुवारी होणाऱ्या क्रिकेट मॅचपूर्वी प्रसारण बंद झाल्याने ग्राहकांमध्ये असंतोष पसरला होता. ग्राहकांची भावना लक्षात घेऊन प्रसारण पुन्हा सुरू करण्यात येत आहे. परंतु ३१ मार्चपूर्वी थकीत रक्कम अदा न केल्यास पुन्हा कडक कारवाई केली जाईल.
- अभिषेक कृष्णा, जिल्हाधिकारी