टिप्परला बोलेरोची धडक
By Admin | Updated: June 4, 2015 02:30 IST2015-06-04T02:30:52+5:302015-06-04T02:30:52+5:30
रस्त्याच्या कडेला नादुरुस्त स्थितीत उभ्या असलेल्या टिप्परवर बोलेरो धडकली. त्यात एका जणाचा मृत्यू तर एक जण जखमी झाला.

टिप्परला बोलेरोची धडक
एक ठार : एक जखमी, तास शिवारात अपघात
भिवापूर : रस्त्याच्या कडेला नादुरुस्त स्थितीत उभ्या असलेल्या टिप्परवर बोलेरो धडकली. त्यात एका जणाचा मृत्यू तर एक जण जखमी झाला. हा अपघात तास शिवारात बुधवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास घडला.
अनुकुल अमूल डकवा (२८) मु. पखनापूर जि. कानकेट छत्तीसगड असे मृताचे तर सुशांत सुशील मंडल (२६) मु. कानकेट असे जखमी बोलेरो चालकाचे नाव आहे. एमएच-३१/सीव्ही-६०३० क्रमांकचा रेती भरलेला टिप्पर पवनीकडून नागपूरला जात होता. दरम्यान एअर पकडल्याने चालकाने राज्यमार्गावरील तास शिवारात टिप्पर रस्त्याच्या कडेला थांबवून ठेवली. टिप्परचालक पंप मारत होता. तेवढ्यात नागपूरला जात असलेली सीजी-०५/डब्ल्यू-३२४७ क्रमांकाची बोलेरा टिप्परवर धडकली. त्यात बोलेरोतील अनुकूल गंभीर होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर घाडामोडे, वाहतूक पोलीस राकेश त्रिपाठी, रमेश काकुळते, अयुब पठाण, मनोज चौधरी, प्रमोद पडोळे, मनोज पाली यांनी घटनास्थळी धाव घेतली. बोलेरोचा दर्शनी भाग टिप्परमध्ये शिरलेला होता. त्यामुळे मृत आणि जखमीला बाहेर काढण्याकरिता पोलिसांना कसरत करावी लागली. याप्रकरणी बोलेरो चालक सुशांत सुशील मंडल विरुद्ध भांदविच्या कलम २७९, ३३६, ३०४ (अ), आर. डब्ल्यू. सहकलम १८४ मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंदविला. पुढील तपास सुरू करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)
मदतीऐवजी केली चोरी
अपघातग्रस्त बोलेरोमध्ये हिरव्या मिरच्या होत्या. अपघातानंतर त्या रस्त्याच्या कडेला पडल्या. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात पाठविले. त्यानंतर मदतीसाठी आलेल्या नागरिकांनी मिरची चोरी करीत तेथून पळ काढला. या प्रकाराचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे.