दोन महिलांची जन्मठेप रद्द
By Admin | Updated: May 30, 2015 02:49 IST2015-05-30T02:49:58+5:302015-05-30T02:49:58+5:30
नातेवाईकाच्या खुनात चंद्रपूर सत्र न्यायालयाने सुनावलेली दोन महिला आरोपींची जन्मठेप उच्च न्यायालयाचे न्या. अरुण चौधरी आणि न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठाने रद्द करून ...

दोन महिलांची जन्मठेप रद्द
नागपूर : नातेवाईकाच्या खुनात चंद्रपूर सत्र न्यायालयाने सुनावलेली दोन महिला आरोपींची जन्मठेप उच्च न्यायालयाचे न्या. अरुण चौधरी आणि न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठाने रद्द करून त्यांची निर्दोष सुटका केली. याच प्रकरणातील अन्य दोघांची जन्मठेप रद्द करून त्यांना भादंविच्या ३२४ मध्ये दोषी धरले. ते जेवढे दिवस कारागृहात होते, तेवढी शिक्षा पुरेशी आहे,असे न्यायालयाने आदेशात नमूद त्यांना ताबडतोब सोडण्याचा आदेश दिला.
हिराबाई ब्राह्मणे, लोपाबाई ब्राह्मणे, महेंद्र ब्राह्मणे आणि सहादेव ब्राह्मणे, अशी आरोपींची नावे असून राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निम्मी येथील रहिवासी आहेत. भारत खाडे, असे मृताचे नाव होते. खुनाची घटना १० जून २०१० रोजी घडली होती. प्रकरण असे की, महेंद्र ब्राह्मणे याची नातेवाईक जिजा हिचा विवाह घटनेच्या १५ वर्षांपूर्वी भारतसोबत झाला होता. घटनेच्या तीन वर्षांपूर्वी ती भारतला सोडून निघून गेली होती. दरम्यान तिने स्वत:ची जमीन महेंद्रच्या नावे करून दिली होती. ही बाब समजताच तो निम्मी गावात गेला होता. त्याचे आरोपींसोबत भांडण होऊन त्यांनी काठी आणि मुसळाने प्रहार करून त्याचा खून केला होता. चंद्रपूर सत्र न्यायालयाने चौघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला त्यांनी उच्च न्यायालयात अॅड. राजेंद्र डागा यांच्यामार्फत आव्हान दिले होते. मृताच्या शरीरावर १८ जखमा होत्या. त्या नाजूक भागावर नव्हत्या, त्यामुळे या जखमा मृत्यूस कारण ठरू शकत नाही. त्याचा मानसिक धक्क्याने मृत्यू झाला असावा, असा बचाव पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. (प्रतिनिधी)