कान्हवा येथे भिंत पडून दोन महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:20 IST2021-02-20T04:20:44+5:302021-02-20T04:20:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : तालुक्यातील कान्हवा येथे भिंत पडून दोन महिला जखमी झाल्या. उषा सूर्यभान राहाटे (वय ५३, ...

कान्हवा येथे भिंत पडून दोन महिला जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : तालुक्यातील कान्हवा येथे भिंत पडून दोन महिला जखमी झाल्या. उषा सूर्यभान राहाटे (वय ५३, रा. आंबेडकर कॉलनी, उमरेड) आणि सुलोचना दादाराव कांबळे (रा. बोरखेडी) अशी जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत. यापैकी उषा राहाटे यांच्या डोक्याला, कमरेला आणि छातीला चांगलाच मार बसला असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना नागपूर येथील खासगी दवाखान्यात अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले आहे. मंगळवारी दुपारी १ ते २ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.
तालुक्यातील कान्हवा येथील रहिवासी ज्ञानेश्वर गेडाम यांचा मुलगा अश्विन याचा मृत्य झाला. यानिमित्ताने तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम त्यांच्या राहत्या घरी होता. समोरच चंद्रभान गेडाम यांचे घर आहे. कार्यक्रम सुरू असतानाच दुपारच्या सुमारास काही अंतरावरच असलेल्या कोळसा खदानीतून ब्लास्टिंगचा धमाका झाला. लागलीच चंद्रभान गेडाम यांच्या घराची भिंत कोसळली आणि यामध्ये दोन महिला जखमी झाल्यात. कोळसा खदानीच्या ब्लास्टिंगमुळेच हा अपघात झाला, असा आरोप माजी उपसरपंच वीणा मांडवकर यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी वेकोलीच्या अधिकाऱ्यांशीसुद्धा चर्चा केली. पीडित महिलांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी विजय गायकवाड, हर्षल गजघाटे, रूपेश लोखंडे, सुभाष गेडाम, शैलेश गणवीर, अभय गेडाम, प्रीती गेडाम, निर्मला गेडाम, मेघा गणवीर, मनीषा कांबळे आदींनी केली आहे.