दुचाकीस्वाराचे अपहरण करून लुटले
By Admin | Updated: November 13, 2015 02:56 IST2015-11-13T02:56:13+5:302015-11-13T02:56:13+5:30
चारचाकी गाडीला दुचाकीची धडक लागल्याने संतापलेल्या कार चालकांनी दुचाकीस्वारास पकडून नेले.

दुचाकीस्वाराचे अपहरण करून लुटले
गाडीला धडक लागल्याचा बदला : लक्ष्मीनगर परिसरातील घटना
नागपूर : चारचाकी गाडीला दुचाकीची धडक लागल्याने संतापलेल्या कार चालकांनी दुचाकीस्वारास पकडून नेले. त्याला रात्रभर डांबून ठेवून मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन दुचाकीसह त्याच्या वस्तू लुटून नेल्या.
ही घटना दिवाळीच्या दिवशी रात्री ८.३० वाजता लक्ष्मीनगर ते श्रद्धानंदपेठ रोडवर घडली. अमोल गौतम गेडाम (३२) रा. गंगानगर झोपडपट्टी गिट्टीखदान असे पीडित युवकाचे नाव आहे. अमोल हा दिवाळीच्या दिवशी प्रतापनगर पोलीस स्टेशन हद्दीतील लक्ष्मीनगर ते श्रद्धानंदपेठ दरम्यानच्या रोडने आपल्या दुचाकीने (एमएच/३१/डीपी/८८३१) ने जात होता. दरम्यान एका चार चाकी वाहनाला त्याच्या दुचाकीचा धक्का लागला. त्यामुळे कार चालक व त्याचा एक मित्र (दोघेही अंदाजे ३० वर्षे वयोगटातील) यांनी अमोलला पकडले. त्याला बळजबरीने कारमध्ये बसविले आणि त्याचे अपहरण केले. एका ठिकाणी नेऊन त्याला रात्रभर डांबून ठेवले मारहाण केली. त्याची बाईक व मोबाईल हिसकावून घेत गुरुवारी सकाळी ११.१५ वाजता त्याला सोडून दिले. पीडित युवकाच्या तक्रारीवरुन प्रतापनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.